लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे हातात हात घालून एकत्रित प्रचार करत असताना पाटील समर्थक काही पदाधिकारी कथोरे समर्थकांना लोकसभा निवडणूक वातावरणातही दुजाभावाची वागणूक देत असल्याने कथोरे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी कल्याणमध्ये प्रचार सभा होती. या सभेसाठी मुरबाड भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी अधिक संख्येने यावे म्हणून या भागाचे आमदार किसन कथोरे यांनी जय्यत तयारी केली होती. या तयारीप्रमाणे कपील पाटील यांच्याकडून मुरबाड भागात या कार्यकर्त्यांना कल्याण मधील सभा ठिकाणापर्यंत आणण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, असे आमदार कथोरे समर्थकांना वाटले होते. परंतु, ठरल्याप्रमाणे मुरबाडमधील काही भागात भाजप कार्यकर्त्यांना आणण्यासाठी पाटील समर्थकांकडून बस पाठविण्यात आल्या नाहीत, त्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे समजते.
आणखी वाचा-…आणि नाईक आनंदाश्रमात फिरकलेच नाहीत
सकाळी ११ वाजल्यापासून मुरबाड मधील अनेक नागरिक, भाजप कार्यकर्ते आपल्या गावच्या नाक्यावर उमेदवार कपील पाटील यांच्याकडून पाठविण्यात येणाऱ्या बसची वाट पाहत बसले होते. शेवटपर्यंत बस न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
निमंत्रणावरून कथोरे बाद
मोदी यांच्या सभेसाठी विशेष निमंत्रितांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष अति महत्वाच्या व्यक्तिंसाठी तयार करण्यात आलेल्या प्रवेश पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्रमजिवी संघटनेचे विवेक पंडित, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असे एकूण २८ जणांच्या प्रतिमा आहेत. या मध्ये मुरबाड मतदारसंघाचे आमदार असुनही आणि या भागाचे तारांकित प्रचारक असुनही किसन कथोरे यांची या विशेष पासवर प्रतिमा नाही. त्यामुळेही कथोरे समर्थक नाराज झाले आहेत.
कपील पाटील यांना कथोरे यांच्या प्रचार कामाविषयीची माहिती आहे, पण कपील पाटील यांचे उजवे, डावे समर्थक कथोरे यांना प्रत्येक गोष्टीत डावलून पाटील आणि कथोरे यांच्यात दुरावा निर्माण करत असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे कटु वातावरण आवश्यक नसताना ते मुद्दाम निर्माण केले जात असल्याबद्दल भाजपच्या मुरबाड भागताली अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्य्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील समर्थकांनी मात्र मुरबाड भागात वेळेवर बस पाठविल्या होत्या, असे सांगितले.
आणखी वाचा-ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
कथोरे गावागावात
मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने त्यांच्या विजयासाठी कपील पाटील या्ंच्या विजयासाठी कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पिंजून काढला आहे. कोणत्याही परिस्थितीत पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यासाठी कथोरे प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
भिवंडी,कल्याणमधील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण कपील पाटील यांचा कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत आहोत. कोठेही नाराजी, कुरबुरीचे वातावरण नाही. कुठे असेल तर ते तात्काळ शमविले जाते. काल मोदींच्या सभेसाठी मुरबाड भागातून बहुतांशी कार्यकर्ते दाखल झाले होते. -किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा.