जयेश सामंत
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पट्टशिष्य अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. दिघे यांच्या प्रभावामुळे १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झालेले शिंदे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो त्यांचे वास्तव्य असलेल्या वागळे इस्टेट भागातील किसननगर या शाखेतून. याच शाखेचे ते पुढे शाखाप्रमुख झाले. किसननगरची शाखा ते मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनापर्यंतचा शिंदे यांचा प्रवास थक्क करणारा ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही किसननगर क्रमांक ३ येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. ऐंशीच्या दशकात ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या माध्यमातून शिवसेनेची पाळेमुळे घट्ट होऊ लागली होती. दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची फौज शिवसेनेच्या झेंडय़ाखाली एकवटू लागली होती. या वातावरणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काम सुरू केले आणि १९८४ मध्ये दिघे यांनी किसननगर शाखेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. दिघे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये शिंदे त्यानंतर सक्रिय राहिले. वागळे इस्टेट भागातील लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेलाचा अवैध साठा करणाऱ्या दुकानदारांविरोधात आंदोलन करणे, नागरी वस्तीत अवैध पद्धतीने सुरू असलेला लेडीज बार बंद करणे अशी चर्चेत राहणारी आंदोलने त्यांनी केली. १९८६ मध्ये सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांसह सहभाग घेतला होता. तेथे त्यांना अटकही झाली होती.
सभागृह नेतेपद निर्णायक..
किसननगर भागातून ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सुरुवातीचा काही काळ शिंदे फारसे चर्चेत राहिले नव्हते. याच काळात त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि शिंदे यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला. दिघे यांनी मात्र त्यांना धीर दिला आणि त्यांची ठाणे महापालिकेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केली. शिवसेनेत ज्येष्ठ नगरसेवकांची मोठी फळी कार्यरत असताना शिंदे यांना दिली गेलेली ही संधी त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी निर्णायक ठरली. ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी असताना शिंदे यांनी याच काळात संपूर्ण जिल्हा आनंद दिघे यांच्या आदेशानुसार पिंजून काढला. संघटनेच्या वेगवेगळय़ा कार्यक्रमांसाठी दिघे त्यांची रवानगी जिल्ह्यातील वेगवेगळय़ा भागात करत असत. याच काळात त्यांचा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी, पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढला. आनंद दिघे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ते ओळखले जाऊ लागले.
जिल्हाप्रमुख, आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री
आनंद दिघे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर मातोश्रीवरून ठाणे जिल्ह्यात नेतृत्वाच्या आघाडीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. मात्र हे प्रयोग फारसे यशस्वी ठरले नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविताच त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. मो.दा.जोशी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जुन्या ठाणे विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. दिघे यांच्या मृत्यूनंतर संतप्त शिवसैनिकांनी ठाण्यातील सिंघानिया रुग्णालय जाळले होते. या प्रकरणात शेकडोंच्या संख्येने शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांनी मुत्सद्दीपणे हे प्रकरण हाताळले आणि बहुतांश शिवसैनिकांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. ठाणे जिल्हा संघटनेत यामुळे त्यांची जरब वाढलीच शिवाय त्यांना मानणारा एक मोठा वर्ग यामुळे तयार झाला. आमदार म्हणून त्यांनी शहरातील बेकायदा बांधकामांच्या पुनर्बाधणीसाठी हाती घेतलेले क्लस्टरचे आंदोलन कमालीचे गाजले. पुढे भाजप-शिवसेनेचे सरकार येताच क्लस्टर योजनेसाठी त्यांनी आग्रह धरला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकासमंत्री म्हणून या योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू केली. कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा चढत्या मताधिक्याने ते आमदार झाले. पायाला भिंगरी लावून फिरण्याची क्षमता, संघटनात्मक बांधणीचे कौशल्य, साम-दाम-दंड-भेद अशा सर्व नीतीचा वापर करत विजयाला गवसणी घालण्याचे कौशल्य यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि त्यानंतर भाजपचे सरकार असतानाही ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा सातत्याने फडकवत ठेवण्याचे कसब शिंदे यांनी दाखविले.