किचन क्राफ्ट
वाक्प्रचार प्रचलित असला तरी आता घरोघरी मातीच्या चुली राहिलेल्या नाहीत. त्यांची जागा आता गॅसच्या शेगडीने घेतली आहे. स्वयंपाकघर म्हटले की, पसारा हे समीकरणही आता कालबाह्य़ झाले आहे. आधुनिक गृहसंस्कृतीतील स्वयंपाकघरे आता दिवाणखान्यासारखीच आटोपशीर आणि टापटीप दिसू लागली आहेत. किंबहुना ती अधिकाधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न दिसू लागला आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू नीटपणे मांडता येणाऱ्या मॉडय़ुलर किचन व्यवस्थेमुळे हे शक्य झाले आहे. मॉडय़ुलर किचनने स्वयंपाकघराचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यामुळे ओटा, त्याच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारच्या वस्तूंचे डबे मिरविणाऱ्या मांडण्या हे गबाळे चित्र नाहीसे होऊन स्वयंपाकघरेही एखाद्या कलादालनासारखी सजू लागली आहेत. मॉडय़ुलर किचनच्या या विश्वात डोंबिवलीतील ‘किचन क्राफ्ट’ने त्यांच्या अत्यंत आगळ्यावेगळ्या डिझाइन्समुळे संपूर्ण देशभरात स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण स्थान मिळविले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वयंपाकघरे बनविण्यात अग्रगण्य असलेल्या ‘किचन क्राफ्ट’ची सुरुवात दोन दशकांपूर्वी डोंबिवलीत अत्यंत छोटय़ा स्वरूपात झाली. सायली जोशी आणि वनिता साळवी या दोन डोंबिवलीकर गृहिणी १९९५ ते ९७ या काळात फायबर ग्लासच्या मूर्ती, शोभेच्या वस्तू बनवीत होत्या. त्या व्यवसायाच्या निमित्ताने फायबर ग्लास या माध्यमाची ताकद त्यांच्या लक्षात आली. विशेषत: लाकडापेक्षा फायबर ग्लास अधिक उपयुक्त आणि किफायतशीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच फायबर ग्लासचा वापर करून आधुनिक पद्धतीचे मॉडय़ुलर किचन बनविता येऊ शकतील, अशी कल्पना त्यांना सुचली. वास्तुविशारद संदीप जोशी आणि अभिजीत सायगांवकर या दोन वास्तुविशारदांच्या मदतीने त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि किचन क्राफ्ट हे लाकूडविरहित (वूडफ्री) मॉडय़ुलर किचन तयार झाले. मॉडय़ुलर किचन विश्वात हा अत्यंत नवीन प्रयोग होता. मुंबई-ठाणे परिसरात त्या वेळी मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहत होती. ग्राहकांना अधिकाधिक नावीन्यपूर्ण आणि चांगल्या सुविधा कशा देता येतील, याचा विचार बांधकाम व्यावसायिक करू लागले होते. लाकूडविरहित ‘मॉडय़ुलर किचन’ आधुनिक सदनिका संस्कृतीत चपखलपणे बसले. अनेकांनी त्यांना पसंती दिली. सुरुवातीला डोंबिवलीतील सोनारपाडा येथील एका छोटय़ाशा जागेत मॉडय़ुलर किचन तयार केले जाऊ लागले. पुढे २००५ मध्ये अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीत ‘किचनक्राफ्ट’चे उत्पादन सुरू झाले. कालांतराने अंबरनाथचा हा कारखाना बंद करून ‘किचनक्राफ्ट’ पुन्हा डोंबिवलीत आले. २०१३पासून डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील विस्तीर्ण जागेत ‘किचनक्राफ्ट’ने उद्योग थाटला. सुरुवातीच्या काळात ‘किचनक्राफ्ट’ची डोंबिवली, ठाणे आणि दादर येथे शोरूम्स होती. कालांतराने ती बंद करण्यात आली. आता मोबाइल व्हॅनद्वारे ‘किचनक्राफ्ट’ मॉडय़ुलर किचनचे विपणन केले जाते. मुंबई-ठाण्यातील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांमध्ये ‘किचनक्राफ्ट’चे लाकूडविरहित मॉडय़ुलर किचन बसविले आहे. त्याची उपयुक्तता लक्षात आल्याने आता अनेक जण ते पाहून ‘किचनक्राफ्ट’ला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहक सरळ कारखान्यात येऊन त्यांना हवे तसे मॉडय़ुलर किचन बनवून घेतात. लाकूडविरहित मॉडय़ुलर किचन या आमच्या प्रयोगाची पुढील काळात अनेक जणांनी नक्कल केल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. हल्ली रेडीमेडचा जमाना आहे. ‘किचनक्राफ्ट’चे हे मॉडय़ुलर किचनही अगदी ‘रेडी टू यूज’ आहेत. आकारमान आणि डिझाइन्सनुसार बनविलेले मॉडय़ुलर किचन संच स्वयंपाकघरात आणून बसविले जातात. वीस वर्षांपूर्वी २५ लाख रुपयांपुरत्या मर्यादित असलेल्या या व्यवसायाने आता वार्षिक सात ते आठ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा टप्पा गाठला आहे.
अॅक्रेलिकचे शटर्स
लाकूडविरहित मॉडय़ुलर किचननंतर ‘किचनक्राफ्ट’ने अॅक्रेलिकचे दरवाजे बनविण्यास सुरुवात केली. लोखंडी शटर्सपेक्षा हे अॅक्रेलिक शटर्स अधिक उपयुक्त ठरतात. मॉडय़ुलर किचनप्रमाणेच ‘किचनक्राफ्ट’चे हे नवे उत्पादनही भारतभर वितरित केले जाते.
सर्वोत्तम दर्जा
गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम ते देण्याचे धोरण अवलंबल्यानेच इतके यश मिळवू शकल्याचे सायली जोशी आणि वनिता साळवी सांगतात. जर्मनीहून मागविलेल्या खास यंत्रांद्वारे सध्या ‘किचनक्राफ्ट’चे मॉडय़ुलर किचन बनविले जातात. त्यात जैन उद्योग समूहाच्या जलरोधक पीव्हीसीचा वापर केला जातो. शुद्ध पाण्यासाठी ‘झीरो- बी’ यंत्रणा बसवून दिली जाते. या देखण्या स्वयंपाकघरात वस्तू ठेवण्यासाठी खास टपरवेअरचे डबे वापरले जातात.