ठाणे : भिवंडी येथील भोईवाडा भागात भररस्त्यात पोटात चाकूने भोसकून एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी जखमी अवस्थेतील तरुणाला शिवीगाळ आणि धमकावित असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये कैद झाले आहे. तसेच अत्यंत विकृतपणे त्याचे हात-पाय पकडून त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत होते. हा हल्ला इतका गंभीर होता की जखमी व्यक्तीच्या पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या. रस्त्यात ये-जा करणारे नागरिक देखील या घटनेत बघ्याची भूमिका घेत होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद नसीम कादीर शेख (२५) याला अटक केली असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
अल्ताफ अन्सारी असे जखमीचे नाव आहे. तो यंत्रमाग कामगार आहे. त्याचे मोहम्मद नसीम कादीर शेख याच्यासोबत वाद झाले होते. रविवारी सायंकाळी मोहम्मद नसीम कादीर शेख याने त्याचे मित्र मन्नु अन्सारी आणि नसीम शेख यांच्या मदतीने त्याला उमर मशीद परिसरात गाठले. त्यांनी त्याला तेथे बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेथून त्यांनी त्याला काही मीटरपर्यंत आणत भर रस्त्यात मारहाण सुरू ठेवली होती. या मारहाणी दरम्यान मोहम्मद नसीम कादीर शेख याने त्याच्या हातातील चाकूने अल्ताफच्या पोटात भोसकले. हा हल्ला इतका गंभीर होता की, त्याच्या पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या. अल्ताफ हा जखमी अवस्थेत रस्त्यावर त्यांच्याकडे माफी मागत सोडून देण्यासाठी याचना करत होता. परंतु त्यांनी त्याला शिवीगाळ आणि धमकाविणे सुरूच ठेवले. त्यानंतर त्या तिघांनी त्याला हाताला आणि पायांना पकडून दुसरीकडे नेले. त्याचवेळी भोईवाडा पोलिसांचे पथक गस्ती घालत होते. अल्ताफच्या आस-पास गर्दी जमली असल्याने त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी मोहम्मद नसीम कादीर शेख याच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या इतर दोन साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अल्ताफ याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर पसरले असून या घटनेनंतर भितीचे वातावरण पसरले आहे.