ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, क्रीडा स्पर्धा, संमेलने/मेळावे, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी सुधारित 31 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून निर्बंध लागू झाले आहेत. यानुसार लग्न समारंभ, सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले निर्बंध खालीलप्रमाणे,

१. बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली.
२. दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा ५० करण्यात आली.
३. अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली.
४. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ व २४ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेले इतर निर्बंध कायम राहतील.

नियमांचे उल्लंघन झाल्या कठोर कारवाई होणार

या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास किंवा आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध!

३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच राज्यात कठोर निर्बंध लागू होणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे ५ हजार ३६८ नवे बाधित सापडले आहेत. त्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या तब्बल १९८ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संभाव्य रुग्णवाढ टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३१ डिसेंबर अर्थात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यात हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण पडलं असून या निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहेत.

काय असतील निर्बंध?

करोना काळात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी ही सर्वात धोकादायक बाब ठरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या ५० इतकी मर्यादित केली जाणार आहे. तसेच, अंत्यसंस्कारांसाठी देखील फक्त २० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all list of restrictions and rule in thane amid rising corona infection pbs
Show comments