डोंबिवली – कोलकत्ता येथे दोन महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून एकाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीला कोलकत्ता पोलिसांनी अटक केली होती. एक आरोपी खून करून महाराष्ट्रातील डोंबिवलीत लपला असल्याची गुप्त माहिती कोलकत्ता पोलिसांना मिळाली होती. कोलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी डोंबिवली जवळील पिसवली गावातील समतानगर झोपडपट्टी भागात राहून एमआयडीसीत मजूर म्हणून काम करणाऱ्या सिराजउद्दीन अहमद शहा उर्फ कॅप्टन (३६) याला अटक केली.

त्याला कोलकत्ता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सिराजउद्दीन दोन महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसीत मजूर म्हणून काम करत होता. पोलसांनी दिलेली माहिती अशी, की कोलकत्ता शहरातील डंकुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी पत्नीच्या अनैतिक संबंधातून दोन इसमांनी बंटी साव या तरूणाची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकरी पळून गेले होते. गुन्हा दाखल होताच डंकुनी पोलिसांनी शिताफीने तपास करून एका आरोपीला कोलकत्ता शहरातून अटक केली होती. दुसरा आरोपी मिळण्यात कोलकत्ता पोलिसांना अडचणी येत होत्या.

फरार आरोपीचा शोध घेत असताना कोलकत्ता पोलिसांना फरार इसम हा महाराष्ट्रातील डोंबिवली शहरात लपला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. कोलकत्ता पोलिसांनी या इसमाच्या तपासासाठी मानपाडा पोलिसांना विनंती केली. डोंबिवलीत आलेल्या इसमाची सर्व माहिती मानपाडा पोलिसांना कोलकत्ता पोलिसांनी पुरवली.

मानपाडा पोलिसांच्या शोध पथकाने मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्टया, कामगार नाके भागात इसमाचा शोध सुरू केला. हा शोध घेत असताना कोलकत्ता येथील एक इसम शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव हद्दीतील समतानगर भागात राहत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी समतानगर झोपडपट्टी भागात सदर इसमाचा शोध घेतला. कोलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक इसम समतानगर झोपडपट्टीत राहत असल्याचे आणि तो एमआयडीसीत कामाला जात असल्याची खात्रीलायक माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी त्या इसमाचा माग काढला. त्याला डोंबिवली एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत असताना ताब्यात घेतले. कोलकत्ता पोलिसांना हवा असलेला हाच इसम असल्याची खात्री पटल्यावर मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने कोलकत्ता खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. ही माहिती मानपाडा पोलिसांनी कोलकत्ता पोलिसांना दिली. कोलकत्ता पोलिसांनी डोंबिवलीत येऊन सदर इसमाचा ताबा घेतला, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.