कल्याण- वाहतूक नियमांचा भंग करुन बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गुरुवारी सकाळी कोळसेवाडी वाहतूक विभागाने शिळफाटा रस्ता, एमआयडीसी डोंबिवली परिसरात कारवाई केली. यावेळी यमराजाचा गणवेश परिधान केलेल्या यमराजाकडून वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना चुकीची कल्पना देण्यात आली.
बेदरकारपणे वाहन चालविले तर त्यामधून अपघात होतो. एखाद्याचा जीव जातो. समोरील व्यक्ती जखमी होतो. हे माहिती असूनही अनेक वाहनचालक वेगाने दुचाकी, चारचाकी चालवितात. नागरी वस्ती, परिसरात शाळा असेल तर तेथे वाहनाचा वेग कमी ठेवावा हे माहिती असूनही अनेक वाहनचालक त्या नियमाकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनचालकांची संख्या अलीकडे वाढल्याने अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई बरोबर गांधीगिरी करुन त्यांना धडा शिकवण्यासाठी एका व्यक्तीला यमराजाच्या गणवेशात वाहन तपासणीच्या ठिकाणी उभे करण्यात आले. ज्या वाहन चालकाने नियमभंग केला. त्यांना यमराजाच्या हातून गुलाब पुष्प देण्यात आले, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
हेही वाचा- कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी सल्लागार नियुक्तीच्या हालचाली; लवकरच निविदा प्रक्रिया होणार सुरु
क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. नियमभंग करणाऱ्याला यापुढील काळात आपणास यमराजाने गुलाब पुष्प देऊन सावध केले आहे. त्यामुळे आपण काळजीपूर्वक वाहन चालविले पाहिजे याची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले. टाटा नाका, एमआयडीसी, सुयोग हाॅटेल, मानपाडा चौक, काटई चौक, तिसगाव नाका भागात हा गांधीगिरीचा उपक्रम राबविण्यात आला.