ठाणे : येथील बाळकुम, कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हा मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करताच त्याची गंभीर दखल घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खाडी भरावप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामुळे पालिका, जिल्हा प्रशासन आणि कांदळवन विभागातील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराला ३२ कि.मीचा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी भागात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढू लागले आहे. बाळकुम आणि कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत आहे. या नव्या बेटामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट झाली आहे. त्याकडे ठाणे महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. या बाबतचे वृत्त लोकसत्ता ठाणे मध्ये प्रसारित झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने भराव रोखण्यासाठी चर खोदून कांदळवनाच्या दिशेने जाणारे मार्ग वाहतूकीसाठी बंद केले होते. असे असले तरी याप्रकरणी मात्र अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. असे असतानाच, ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कोलशेत, बाळकुम खाडी किनारी भागातील राडारोड्याच्या भरावाचा मुद्दा विधानसभेत प्रश्नउत्तराच्या तासात उपस्थित केला.

हेही वाचा…ठाणे महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह इतर पाचजणांचा समावेश, उपायुक्त जोशी यांनी आरोप फेटाळून लावले

कोलशेत आणि बाळकुम भागात खाडीतील कांदळवन मातीभरावाने उद्ध्वस्त झाली असून येथे मैदाने तयार झाली आहेत. या आधी कांदळवन तोडून त्यावर बांधकामेही झाली आहेत. नागरीकरणामुळे येथे पूर्वी येणारे फ्लेमिंगोसारखे विदेशी पक्षी देखील येईनासे झाले आहेत तर निसर्गाचाही ऱ्हास झाला असल्याचे केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. याबाबत वन, महसूल आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून कारवाई टाळत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि तथाकथित विकासकांचे फावले असून काँक्रीटची जंगले वाढत आहेत. या तीन पैकी एकाच विभागाकडे जबाबदारी निश्चित करण्यात यावी अथवा तिन्ही विभागांनी एकत्रित कारवाई करावी, अशी मागणी केळकर यांनी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कांदळवनाचा ऱ्हास होत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आर्थिक दंड आकारण्याऐवजी शिक्षा भोगण्याची तरतूद करण्याची गरज व्यक्त केली. ठाण्यात कांदळवन उद्ध्वस्त करून त्यावर बांधकामे होत असतील तर आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolshet bay filling case to be investigated due to the orders of the forest minister officials are in a round of inquiry psg
Show comments