ठाणे : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार, कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्याने आता ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहिम राबवली जाणार असून विविध ठिकाणी २९ स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे. २ डिसेंबर ते ११ डिसेंबर काळात यासाठी अर्ज करता येणार आहे. विरार येथील बोळींज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण, ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडार्ली येथे १४ हजार ०४७ घरे उपलब्ध आहेत.
म्हाड्या कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरे बांधून तयार आहेत. अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्याने या घरांच्या जाहिरातीकडे अनेकांनी पाठ फिरवली. त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेतील १४ हजार ०४७ घरे प्रतिसादाअभावी पडून आहेत, अशी माहिती कोकण मंडळातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा कोकण मंडळाने पुन्हा एकदा नवी मोहिम हाती घेतली आहे. येत्या २ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ या काळात म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहिम राबवण्यात येते आहे.
हेही वाचा…दिव्यातील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुख्य आरोपी फरार, तर प्राध्यापिका अटकेत
ग
आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही घरे विक्री केली जाणार आहेत. वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील विरार-बोळींज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण, मौजे खोणी, तसेच मौजे भंडार्ली, मौजे गोठेघर येथे ही घरे उपलब्ध आहेत. या अभियानांतर्गत म्हाडाचे कर्मचारी नागरिकांना गृहप्रकल्पांची माहिती देणार आहे, शिवाय म्हाडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी व अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना, हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याकरिता या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा…पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात; चालक जखमी
मोहिम नेमकी कशी
म्हाडा कोकण मंडळातर्फे सदनिकांची माहिती lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली असून तेथे नोंदणीही करता येणार आहे. सोबतच मंडळातर्फे आता विविध २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून तेथे मंडळाचे कर्मचारी या योजनेबद्दल माहिती देतील. वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे आणि पालघर महापालिकांच्या कार्यालयात, तहसिल कार्यालयात, उपविभागीय कार्यालयात हे स्टॉल लावण्यात आले आहेत.