मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात संत्री विक्रेत्यांना रेल्वे प्रशासनाने हटवले आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल घेत रेल्वे विक्रेते पुन्हा स्थानकात बसणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत.
कोपर रेल्वे स्थानकात संत्रे विक्रेत्यांची संख्या कमालीची वाढली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. विक्रेते टोपलीतील कचरा रेल्वे मार्गात टाकत होते. याशिवाय स्थानकात जागोजागी अस्वच्छता वाढत होती.
दिवा-वसई मार्गावरील प्रवाशी आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांमुळे काही वेळेला या स्थानकात मोठी गर्दी होते. सकाळ संध्याकाळच्या वेळी हे स्थानक प्रवाशांनी खचाखच भरलेले असते. त्यात संत्री विक्रेत्यांची संख्या वाढत गेल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश दिले असताना रेल्वे मात्र झोपी गेली होती. त्यामुळे कोपर स्थानकात संत्री विक्रेत्यांची संख्या वाढली होती.
रेल्वेने विक्रेत्यांवर कारवाई केली आहे, त्यामुळे काही दिवस त्यांची संख्या कमी झालेली दिसेल; परंतु ते पुन्हा या स्थानकात ठाण मांडून बसतील, याची काहीही शाश्वती नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. रेल्वे सुरक्षा बल सूत्रांनी मात्र याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, संत्री तसेच इतर फळे विक्रेत्यांचा लोकलमधील प्रवाशांना त्रास होतो. फळांचे आवरणे डब्यात टाकण्यात येतात, त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते, अशी तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader