मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम जवळ-जवळ संपुष्टात आले आहे. गुरुवारपासून प्रशासनाने कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशेकडील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली होती. त्यामुळे ही मार्गिका आता तीन-तीन पदरी सुरू झाली होती. ही मार्गिका खुली झाल्याने सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात कमी झाली होती. परंतु अचानक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अपूर्ण काम असल्याचे सांगत ही मार्गिका पुन्हा बंद केली. त्यामुळे उद्घाटनाच्या श्रेयवादासाठी ही मार्गिका बंद केली का असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जात आहे. मार्गिका बंद केल्याने या भागात वाहतूकीचा ताणही वाढला होता.
हेही वाचा >>>कल्याण: तडीपारीचा सोक्षमोक्ष लावण्याचे कल्याणच्या बंड्या साळवी यांचे पोलिसांना आवाहन
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा कोपरी उड्डाणपूल हा वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग धोकादायक तसेच अरुंद असल्याने २०१८ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून हा उड्डाणपूल तोडून त्याठिकाणी आठ पदरी पूल करण्याचे काम सुरू केले आहे. एमएमआरडीएने दोन टप्प्यात या पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी या पूलाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच, मुख्य पूलालगत दोन अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या अतिरिक्त मार्गिका सुरू झाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेने मुख्य उड्डापणूलाच्या मार्गिकेच्या निर्माणाचे म्हणजेच, मुख्य पूलाचे काम हाती घेतले.
हेही वाचा >>>आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”
मुख्य पूलाच्या मार्गावर काम सुरू झाल्याने कोपरी येथील सेवा रस्ता, तीन हात नाका मार्गिका या मुख्य रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. अनेकदा सकाळी तीन हात नाका उड्डाणपूलापर्यंत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल होत असतात. सध्या या मुख्य पूलाचे काम जवळ जवळ संपुष्टात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने गुरुवारी मुख्य पुलावरील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली होती. तर उर्वरित एक-एक पदरी मार्गिका ही किरकोळ कामांसाठी बंद ठेवण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी अचानक मार्गिकाचे काम शिल्लक असल्याचे कारण देऊन एमएमआरडीएने ही एकपदरी मार्गिका बंद केली. वाहतूकीसाठी मार्गिका अरुंद झाल्याने परिसरात पु्न्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणेकर वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या पूलाच्या निर्माणाचे श्रेय घेण्यासाठी तसेच आगामी निवडणूका लक्षात घेऊन या पूलाच्या उद्घाटन करण्यासाठी पुूलाची मार्गिका बंद केल्या आहेत का, असा प्रश्न वाहन चालक विचारत आहेत.