बदलापूरः गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोकप्रतिनिधींशिवाय चालणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणीही नसल्याने पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतो आहे. कोविड काळातील खर्चासाठी राज्य शासनाकडे विनंती करणाऱ्या पालिकेने शहरात नुकनीकरणाच्या नावाखाली सुस्थितीत असलेल्या पेव्हर ब्लॉक काढून त्याजागी नवे बसवण्याचे खर्चिक काम हाती घेतले आहे. बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते मांजर्ली या रस्त्यावर मोहनानंद नगर भागात सध्या हे काम सुरू असून अनावश्यक कामावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>> ठाणे : रेल्वे पूलाच्या कामामुळे मध्यरात्री कोपरी पूल वाहतूकीसाठी बंद
बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते मांजर्ली हा रस्ता आधीच अरूंद आहे. या रस्त्याच्या मांजर्ली स्मशानभूमी ते मांजर्ली चौक या भागात रस्त्याच्या दुतर्फा पदपथ गायब झाले आहेत. अनेक दुकानदारांनी पदपथावर आपली दुकाने मांडली असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, आस्थापना, दवाखान्यात येणारे रूग्ण, ग्राहक यांच्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्याचा खुप छोटा भाग वापरासाठी शिल्लक उरतो. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मांजर्ली स्मशानभूमी ते मांजर्ली चौकाच्या एका बाजूला रस्त्याच्या कडेला असलेले पेव्हर ब्लॉक काढले जात आहेत. त्यासाठी चार दिवसांपासून मजूर काम करत असून हे पेव्हर ब्लॉक काढून रस्त्यावर ठेवले जात आहेत. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो आहे.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत रस्ते कोंडीमुक्त; रस्त्यांवरील भंगार वाहनांची आधारवाडी कचराभूमीवर रवानगी
या पेव्हर ब्लॉकच्या शेजारी वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावर कोंडी होते आहे. मात्र येथे काढली जात असलेले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत असताना का काढली जात आहेत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. येथे काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत असून काढल्यानंतरही ते चांगले दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या नावाखाली कुणाचे खिसे भरण्यासाठी हा अट्टाहास सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
खोदलेल्या ठिकाणीच नवे पेव्हर
इंटरनेटच्या वाहिन्या टाकण्यासाठी ज्या ठिकाणी खोदकाम झाले. त्याच ठिकाणी नवे पेव्हर ब्लॉक लावले जात असल्याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले आहे. मात्र ज्या ठिकाणे पेव्हर ब्लॉक चांगले आहेत तेही काढले जात असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.