बदलापूरः घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेने २०१८ वर्षात विकत घेतलेल्या ४२ घंटागाड्या पालिकेने सात वर्षात भंगारात काढल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सात वर्षात ही वाहने धुळखात पडून होती. लोकप्रतिनिधींनी विविध कारणे दाखवत त्या त्या वेळी या घंटागाड्या रस्त्यावर उतरू दिल्या नाहीत. अखेर वाहतुकीस योग्य नसल्याचे सांगत पालिकेने या गाड्या आता भंगारात विकण्यास काढल्या आहेत. बदलापुरकरांच्या कराच्या पैशांतून लाखो रूपये खर्चून घेतलेल्या या गाड्या वापराविना भंगारात काढल्याने नागरिकांत संताप आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोट्यावधींचा खर्च केला. मात्र कचरा व्यवस्थापनासह अनेक गोष्टी शहरात होऊ शकल्या नाहीत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार शहरातील कचरा उचलण्यासाठी ४२ गाड्यांची गरज अहवालात नमूद होती. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने ५ लाख ८६ हजार ९९० रूपये प्रति वाहन या दराने ४२ गाड्यांची खरेदी केली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेने घंटागाई आणि सफाई कामगारांचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता. लोकसंख्यानिहाय गाड्यांचे वाटप आणि त्यानुसार कंत्राटदार नेमला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच ऑक्टोबर २०१८ मध्ये ४२ घंटागाड्या शहरात दाखल झाल्या. तेव्हापासून आजतागायत या घंटागाड्या पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात धुळखात पडून आहेत. यातील काही गाड्या काही दिवस वापरण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र काही गाड्या वडवली येथील डोंगरावर, काही गाड्या मोकळ्या जागेत अनेक महिने धुळखात पडल्याचे समोर आले होते. आता या गाड्या पालिका प्रशासनाने भंगारात विक्रीसाठी काढल्या आहेत. या गाड्यांसाठी पालिकेच्या तिजोरीतून सुमारे अडीच कोटी खर्च झाल्याची माहिती आहे.

कंत्राटदाराच्या हितासाठी गाड्या धुळखात ?

२०१८ वर्षात या तत्कालीन कचरा उलचणाऱ्या कंत्राटदाराला या गाड्या देण्यावरून लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. या गाड्या दिल्यास कंत्राटदाराला भूर्दंड पडेल असा दावा त्यावेळी लोकप्रतिनिधींचा होता. याबाबत लोकसत्ता ठाणेमध्ये १९ जानेवारी २०१९ मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. कमी क्षमता आणि अतिरिक्त खर्च गाड्यांसाठी लागत असताना या गाड्यांचा खरेदीला कुणीही विरोध केला नव्हता. त्यामुळे या गाड्या धुळखात पडून राहिल्या.

पुन्हा एकदा चुराडा

कुळगाव बदलापूर नगरपालिकेत नागरिकांच्या पैशांचा चुराडा करण्याची परंपरा जुनी आहे. यापू्र्वी एका बायोगॅस निर्मिती प्रकल्पात एक किलोही बायोगॅस निर्मिती न होता त्यावर लाखो रूपये खर्च झाल्याचे भाजप नगरसेवकाने उघडकीस आणले होते. शहरात विविध चौकांमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाले उभारलेले किरकोळ शिल्पासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत. उद्यानात काचा बसवणे, मंच उभारणे, भर पदपथावर खुली व्यायामशाळा उभारणे अशा कामातही अनेकदा नागरिकांच्या पैशांचा चुराडा झाल्याचे दिसून आले आहे.