नाशिकमध्ये बारा वर्षांनी आलेल्या कुंभपर्वात मानापमान नाटय़, शाही स्नानासाठीची तयारी, काही लाख साधूंची नाशिकमध्ये वाढती वर्दळ आदी गोष्टी घडत आहेत. याचबरोबरीने अनेक आखाडे आपले बस्तान थाटण्यातही गर्क आहेत. या पाश्र्वभूमीवर त्र्यंबेकेश्वर येथेही आखाडय़ांची लगबग सुरू झाली आहे. त्र्यंबेकेश्वरला या आखाडय़ांपैकीच एका आखाडय़ात अनोखी सजावट होत असून ही संपूर्ण सजावट बदलापूरचे कलाकार सचिन झुवाटकर यांच्या निर्मितीतून होत आहे.कुंभपर्व आता पुढील दीड ते दोन महिने चालणार असून याला लाखो भाविक, साधू देश व जगभरातून हजेरी लावणार आहेत. तसेच या कुंभपर्वात अग्रभागी असणाऱ्या साधूंचे आखाडे येथे सज्ज होत आहेत. यातील निलगिरी पर्वतावरील दशनाम जुना आखाडा त्र्यंबेकेश्वर येथे उभा राहत असून याच्या सजावटीचे काम हे बदलापुरातील कलाकार सचिन झुवाटकर हे करत आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर भारतीय संस्कृतीतील चित्रशैलीशी निगडित महीरपींचा वापर येथील सजावटीत करण्यात आला आहे. येथील सिंहासने, मूर्ती आदींची निर्मितीही याचपद्धतीने येथे करण्यात आली आहे. याचबरोबरीने येथील भिंतींवर गाडगे महाराज, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, गगनगिरी महाराज आदी महाराष्ट्रातील संत परंपरेच्या वाटचालीचे व त्यांच्या विचारांचे फलक बसविण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात अशा पद्धतीने आखाडा सजविण्याची ही पहिलीच वेळ असून बदलापुरातीलच प्रिंटहब डिजीटल प्रिटिंग्समधून येथील तब्बल ३३०० चौरस फुट फलकांची छपाई करण्यात आली आहे, असे ही निर्मिती करणारे व जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून प्रशिक्षण घेतलेले सचिन झुवाटकर यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या आखाडा सजावटीचे काम बदलापुरात
नाशिकमध्ये बारा वर्षांनी आलेल्या कुंभपर्वात मानापमान नाटय़, शाही स्नानासाठीची तयारी, काही लाख साधूंची नाशिकमध्ये वाढती वर्दळ आदी गोष्टी घडत आहेत.
आणखी वाचा
First published on: 01-09-2015 at 01:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh mela arena decoration work in badalapurata