कल्याण पूर्व, २७ गावांची तहान भागविण्याची क्षमता
अंबरनाथ तालुक्यातील काही भाग सिंचनाखाली आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कल्याण पूर्व तसेच २७ गावांची तहान भागविण्याची क्षमता असणारे कुशीवली धरण राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही या एकमेव कारणामुळे मागील सात ते आठ वर्षांपासून रखडले आहे. पाणी साठवणीसाठी शासन जलयुक्त शिवार, रखडलेले धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असताना कुशीवली धरणासाठी ३० कोटीचा निधी शासन उपलब्ध करुन देत नसल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कल्याणपासून आठ किलोमीटर अंतरावर मलंग गडाच्या पायथ्याशी कुशीवली धरणाचे खोरे आहे. कल्याण, डोंबिवली आणि २७ गावांच्या माथ्यावर कुशीवली धरण क्षेत्र आहे. हे धरण पूर्ण झाले तर अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली, आंबे, ढोके, काकडवाल, मांगरुळ, नेवाळी, कुंभार्ली, करवले, उसाटणे परिसर सिंचनाखाली येऊन ०बारमाही पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच, कल्याण डोंबिवली शहरांच्या माथ्यावर हे धरण क्षेत्र आहे.
कल्याण डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, त्या प्रमाणात पाण्याची वाढती मागणी विचारात घेऊन कुशीवली धरणातून संपूर्ण कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्राला नाही, पण कल्याण पूर्व, २७ गाव परिसराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो इतका पाणीसाठा या धरणात असणार आहे. हा पाणी साठा उपलब्ध झाल्यामुळे पालिकेला बारवी, आंध्र धरणाच्या पाणी पुरवठय़ावर जे अवलंबून राहावे लागते. त्यामधील काही अवलंबित्व कमी होऊ शकणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेला दररोज ३०० दशलक्ष पाणी पुरवठय़ाची गरज आहे. ०यामधील काही दशलक्ष लीटर पाणी कुशीवली धरणातून दैनंदिन उपलब्ध झाले तरी पालिकेच्या पाणीपुरवठय़ावरील ताण कमी होणार आहे, असे भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

कुठे आहे धरण
कल्याणपासून आठ किलोमीटर अंतरावरील मलंग गडाच्या डोंगर रांगेत पाच पीर डोंगर, मलंग गडाचा माथा यांच्या कुशीत हे धरण क्षेत्र आहे. प्रस्तावित धरणाच्या पायथ्याला नदीसारखी मोठी घळ (लहान नदी) आहे. पावसाळ्यात ही घळ दुथडी भरुन वाहते. डिसेंबपर्यंत या घळीत पाणी असते. कुशीवली गावच्या वेशीवरुन ते आंबे गावच्या हद्दीपर्यंत या धरणाची बांधकाम रेषा आहे. उलटा ‘एल’ आकाराच्या बांधाची रचना या धरणासाठी प्रस्तावित आहे.

सहा वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने २०११ मध्ये कुशीवली लघु पाटबंधारे प्रकल्प आकाराला आणण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. २९ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी या धरणाच्या उभारणीसाठी प्रस्तावित होता. कुशीवली धरण मातीचे आहे. या धरणाला सांडवा, बाह्य़ कालवा प्रस्तावित आहे. निविदा प्रक्रियेनंतर सुरुवातीचे सहा महिने कुशीवली धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात यंत्र सामुगी आणून माती, दगडांचे नमुने घेण्याची कामे सुरु करण्यात आली होती. धरणाच्या हद्दीसाठी चर खोदण्याचे काम सुरु केले होते. तीन वर्षांत हे धरण बांधून पूर्ण करण्यात येणार होते. कुशवली परिसरातील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला होता. पण सहा महिने काम करुनही मजुरांना लघु पाटबंधारे विभागाकडून कामाची मजुरी देण्यात आली नाही. कामाचा, जमिनीचा मोबदला देण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थ व मजुरांनी धरणाची कामे मग बंद पाडली, असे कुशीवलीचे ग्रामस्थ रमेश पाटील यांनी सांगितले. कुशीवली धरणामुळे गावचा विकास होणार असल्याने शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीचा मोबदला, बुडविलेली मजुरीचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे जुनेजाणते महादू गायकर यांनी सांगितले.

कुशीवली धरण प्रकल्प पूर्ण होण्यात निधीची उपलब्धता ही एक मोठी अडचण आहे. या धरणासाठी वन विभागाची काही जमीन लागणार आहे. ती जमीन मिळविण्यासाठी वन विभागाकडे पैशांचा भरणा करण्यात आला आहे.धरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला तर मोठा भाग सिंचना खाली येईल. तसेच, कल्याण-डोंबिवली पालिकेने या धरणाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला तर पालिकेला अखंड पाण्याचा स्त्रोत व स्वत:चे धरण उपलब्ध होईल.
– किसन कथोरे, आमदार, अंबरनाथ

Story img Loader