ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागात १९ वर्षीय बेदरकार कार चालकाच्या धडकेत एका मजूराला रस्ता ओलांडताना जीव गमवावा लागला आहे. अनूज राय (३०) असे मृताचे नाव असून या अपघाताप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अनूज याच्या सहकाऱ्याने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

गायमुख भागातील मंदिर परिसरात अनूज याच्यासह आठ मजूर एका घरामध्ये राहतात. ते परिसरातील एका व्यक्तीकडे बिगारी मजूर म्हणून काम करतात. धुलिवंदना निमित्ताने सुट्टी असल्याने रात्री जेवल्यानंतर अनूज हा फेरफटका मारण्यासाठी घोडबंदर परिसरात पायी जात होता. दरम्यान, येथे रस्ता ओलांडत असताना ठाण्याहून मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या एका भरधाव कारची त्याला धडक बसली. या घटनेत त्याच्या हाताला, डोक्याला, पायाला, पोटाला गंभीर दुखापत झाली. हा सर्व प्रकार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या अनूजच्या सहकाऱ्याने पाहिला.

डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याच्या सहकाऱ्याने इतर मजूरांना बोलावून घेतले. त्यांनी १९ वर्षीय कार चालकाला रोखले. तसेच अनूजला उपचारासाठी एका रिक्षाने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी शनिवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनूजच्या सहकाऱ्याने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे १९ वर्षीय कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader