नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाकडून पर्यावरणपूरक विद्युत वाहने खरेदी करण्याचे धोरण आखण्यात आले असले तरी मुंबई महानगर क्षेत्राचा मोठा भाग असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मात्र यासंबंधीची सार्वजनिक व्यवस्थेची आखणी कागदावरच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नागरिक विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. असे असले तरी या वाहनांसाठी अत्यावश्यक असलेल्या चार्जिंग स्थानकांचा अभाव सर्वच शहरांमध्ये दिसून येत आहे. यासाठी नवी स्थानके उभारण्याच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात या आघाडीवर मंदगतीचा कारभार दिसून येतो.

हेही वाचा >>>डोंबिवलीत प्रभू श्रीरामाच्या दीप तेजाचा ” विश्वविक्रम”;  दिव्यांच्या माध्यमातून रेखाटलेली सर्वात मोठी चित्र रांगोळी

ठाणे शहरात विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी ठाणे महापालिका शहरात ६७ चार्जिंग स्थानके उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ पैकी ३० जागांवर चार्जिंग स्थानकांची उभारणी केली जाणार असून त्यापैकी १० जागा महापालिकेने निश्चित केल्या होत्या. या जागा नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकर, वर्तकनगर, माजिवाडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा, दिवा अशा नऊ प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. याठिकाणी महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेमार्फत चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने महाप्रीतबरोबर एक करारही केला होता. प्रत्यक्षात मात्र स्थानकांची उभारणी होऊ शकलेली नाही. या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांगी केसवाणी यांच्याशी संपर्क साधला असता, दहा जागा अंतिम करण्यात आलेल्या आहेत. पालिका आणि महाप्रीत यांच्यात अंतिम करार होईल आणि त्यानंतर ते शहरात चार्जिंग स्थानके उभारण्यास सुरुवात करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेने सद्य:स्थितीत नेरुळ परिसरात दोन ठिकाणी अशी स्थानके उभारली असली तरी ती पुरेशा प्रमाणात कार्यान्वित नसतात अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात अशा स्थानकांचा शहरभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात एखाद, दुसऱ्या ठिकाणांचा अपवाद वगळला तर हा विस्तार दूर मूळ सुविधाही प्रभावीपणे सुरू करणे येथील व्यवस्थेला जमलेले नाही. अशा स्थानकांची उभारणी, संचलनासाठी स्वतंत्र्य निविदा काढण्यात आली आहे, असा दावा येथील अभियांत्रिकी विभागातील सूत्रांनी केला.

कल्याण-डोंबिवली महापालिका

कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५० चार्जिंग स्थानके उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यापैकी शहाड येथे चार्जिंग स्थानक उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु तिथेही स्थानक अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाही.

वसई-विरार, मिरा-भाईंदर, पालघर 

वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकही चार्जिंग स्थानक नाही.  मीरा-भाईंदर महापालिकेने स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून दोन ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारली आहेत.ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालघरच्या ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पालिका मुख्यालयाशेजारी एक विद्युत वाहने चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तर लवकरच महापालिकेची परिवहन सेवा नव्याने सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र चार्जिग स्टेशनची उभारणी केली जात आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात चिखलोलीजवळ चार्जिंग स्थानक प्रस्तावित आहे. बदलापुरातही चार्जिंग स्थानक प्रस्तावित आहे. या केंद्रांची तांत्रिक मंजुरी प्रक्रियेत आहे. त्यांची उभारणी लवकरच केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

वाहन संख्या

ठाणे – १०,५४९

कल्याण  – ८१२४

नवी मुंबई – ४,६८५

वसई-विरार – १०,४२१

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of charging stations for electric vehicles thane palghar amy
Show comments