वसईतील राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या आगारातील वास्तव

वसई : वसईतील राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याने अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून राहत असलेल्या ठिकाणी वीज, पाणी व इतर सोयी-सुविधा मिळत नसल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

वसई पूर्वेतील भागात राज्य परिवहन महामंडळाचे एसटी आगार आहे. या आगारातून विविध ठिकाणी एसटी बसेस सोडल्या जात आहेत. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी तयार करण्यात आलेल्या खोलीमध्ये मागील काही दिवसांपासून वीज उपलब्ध नाही तर दुसरीकडे स्नानगृहात व शौचालयात पाणी नसल्याने कुचंबणा होत आहे. तसेच, या आगाराच्या आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरल्याने या दुर्गंधीयुक्त वातावरणात कर्मचाऱ्यांना राहावे लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

करोनाचा काळ सुरू आहे तरीसुद्धा परिसराचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरची सुविधा, हॅण्डवॉश सेंटर अशी कोणतीही सुविधा आगारात उपलब्ध नाही. या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचारी वर्गाने केला आहे.

वसई आगारात सर्व सोयी सुविधा योग्यच

वसईच्या आगारात सर्व सोयी सुविधा या योग्यरीत्या दिल्या जात आहेत. आगारात ज्या समस्या आहेत त्यावर लक्ष देऊन सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. नुकताच आगारात विजेची विद्युत वाहक तार ही शॉर्ट झाल्याने विद्युत प्रवाह बंद झाला होता तसेच जर या ठिकाणी पाणी सुरू केले तर त्यामध्ये विद्युत प्रवाह येऊन दुर्घटना होऊ  शकते यासाठी पालघरवरून तांत्रिक बोलावून याची योग्य ती दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच सध्या करोना प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण आगाराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.

दोन महिन्यांपासून वेतन नाही

वसई आगारात कर्मचारी विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊन सेवा देत आहेत मात्र मागील दोन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक पेचप्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. करोनाचा काळ सुरू आहे . वेतनच मिळाले नसल्याने घर खर्च कसा चालवायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सामाजिक अंतराचाही फज्जा ?

महामंडळाच्या वसई, अर्नाळा, नालासोपारा येथून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांमार्फत चालविली जाते. मात्र  अधिकारी वर्ग चालक वाहक यांना कार्यवाहीची भीती दाखवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करून एका बाकावर दोन दोन प्रवासी बसवून कामगिरी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. .