कल्याण – रविवारी क्रिकेट विश्वचषक, छट पूजा आणि जलाराम जयंती असे तीन सण आणि उत्सव एकाच दिवशी आले आहेत. या कार्यक्रमांसाठी राजकीय मंडळी, सोसायटी पदाधिकाऱ्यांना एलईडी स्क्रिनची गरज आहे. अगोदरच काही मंडळींनी हे स्क्रिन नोंदणीकृत करून ठेवल्याने आयत्यावेळी या स्क्रिनची मागणी करणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली परिसरातील मागणीकर्त्यांना स्क्रिन मिळत नसल्याचे सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रविवारचा भारत-आस्ट्रेलियाचा विश्वचषक क्रिकेट सामना सोसायटीच्या आवारात सोसायटीतील सदस्यांनी एकत्रित बसून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. हा आनंद लुटण्यासाठी सोसायटी आवारात १०० ते १५० फुटाचा एलईडी स्क्रिन लावण्याचे नियोजन सोसायटी पदाधिकारी, काही राजकीय मंडळींनी केले आहे. हे स्क्रिन अगोदरच काही सोसायटी पदाधिकारी, राजकीय मंडळींनी करून ठेवल्याने आयत्या वेळी एलईडी स्क्रिनची मागणी करणाऱ्यांना स्क्रिन उपलब्ध होत नसल्याचे सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.काही उत्तर भाषक समाज मंडळांनी आपल्या वस्त्यांमध्ये एलईडी स्क्रिन लावून छट पूजेचा आनंद बसल्या जागी घेण्याचे नियोजन केले आहे. गुजराती समाजाची वस्ती असलेल्या भागात जलाराम जयंती साजरी करण्यात येते. हा उत्सव वस्तीमधील सर्व नागरिकांना एकत्रितपणे पाहता यावा म्हणून गुजराती वस्ती असलेल्या भागात एलईडी स्क्रिन लावण्यात आले आहेत. अशी वस्ती असलेल्या भागात नव्याने एलईडी स्क्रिन लावण्यासाठी एलईडी स्क्रिन पुरवठादारांकडून मागणी करण्यात येत आहे. पण वाढीव एलईडी स्क्रिन मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरात उपलब्ध नसल्याची माहिती डोंबिवलीतील एलईडी स्क्रिन पुरवठादार केवीन संगोई यांनी दिली.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील ८४ वर्षांचे ज्येष्ठ क्रिकेट खेळण्यासाठी डोंबिवली जीमखाना मैदानावर; भारतीय क्रिकेट संघाला मानवंदना

मुंबई परिसरात सुमारे ६० ते ७० हून अधिक, उल्हासनगर ते डोंबिवली परिसरात ४० एलईडी स्क्रिन पुरवठादार आहेत. या पुरवठादारांकडील स्क्रिन अगोदरच नोंदणीकृत आणि रविवारच्या विश्वचषक, छट पूजा आणि जलाराम जयंती कार्यक्रमांसाठी लावून झाले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी एलईडी स्क्रिन लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेले संयोजक, आयोजक एलईडी स्क्रिनसाठी मुंबई ते उल्हासनगर भागात धावाधाव करत आहेत. पण त्यांना स्क्रिन मिळत नसल्याचे पुरवठादार संगोई यांनी सांगितले.

दैनंदिन दिवसात १०० चौरस फुटाचा एलईडी स्क्रिन सुमारे १० ते १५ हजार रूपये भाड्याने दिला जातो. हाच स्क्रिन आता २५ हजार रूपये भाड्याने घेण्यासाठी काही राजकीय मंडळी, सोसायटी पदाधिकारी इच्छुक आहेत. परंतु, त्यांना अनेक प्रयत्न करूनही, चढा भाव देण्यासाठी तयार असुनही एलईडी स्क्रिन मिळत नसल्याचे पुरवठादारांनी सांगितले.विश्वचषकाचा सामना एकत्रित बसून पाहण्यात वेगळी मजा असते. त्यामुळे आम्ही आयत्यावेळी सोसायटी आवारात एलईडी स्क्रिन लावून सामना पाहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपासून आम्ही स्क्रिन शोधत आहोत, पण आम्हाला वाढीव भाडे देण्यास तयार असुनही एलईडी स्क्रिन उपलब्ध नसल्याने मिळत नसल्याची माहिती डोंबिवलीतील विजय भांडे यांनी दिली.

“ दोन दिवसांपासून आमच्याकडे एलईडी स्क्रिनची मागणी अनेक सोसायटी पदाधिकारी, राजकीय मंडळी करत आहेत. हे स्क्रिन एक ते दोन महिना अगोदर नोंदणीकृत आणि ते रविवारच्या विश्वचषक, सण, उत्सवांसाठी बसून झाले आहेत. त्यामुळे नव्याने स्क्रिनची मागणी करणाऱ्यांना आम्ही स्क्रिन देऊ शकत नाहीत.”- केवीन संगोई, एलईडी स्क्रिन पुरवठादार, डोंबिवली.