रेल्वे प्रशासनाचा निर्णय; २५ डिसेंबरपासून अंमलबजावणी

भाईंदर : सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा भाईंदरहून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. २५ डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

भाईंदरहून सकाळी ९ वाजून ०६ मिनिटांनी महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात येत होती. नोकरी करणाऱ्या महिलांसह, वयोवृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांसाठी ऐन गर्दीच्या वेळेत या लोकलमुळे मोठा दिलासा मिळत होता. मीरा रोड स्थानकातील महिलांनाही ही लोकल सोयीची ठरत होती. परंतु १ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेने बदललेल्या लोकलच्या वेळापत्रकात भाईंदरहून सुटणारी विशेष महिला लोकल रद्द करून ती विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला. भाईंदरहून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याचे कारण रेल्वेकडून देण्यात आले. वसईहून सुटणारी महिला लोकलही अशाच पद्धतीने विरारहून सोडण्यात येत आहे.

रेल्वेच्या या निर्णयाविरोधात मीरा-भाईंदरहून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. भाईंदर आणि मीरा रोड येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेने काढलेला निष्कर्ष चुकीचा असून महिला विशेष लोकल पुन्हा भाईंदरहूनच सोडण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. लोकल विरारवरूनच भरून येऊ लागल्याने भाईंदर तसेच मीरा रोडच्या महिलांना लोकलमध्ये चढणे त्रासदायक होऊ लागले. मीरा रोड स्थानकात महिला प्रवाशांनी या विरोधात रेल रोको आंदोलनही केले.

या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या समस्येवर तोडगा काढला असून महिला लोकलची संख्या दोनने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून भाईंदरहून पूर्वीप्रमाणेच सकाळी ९.०६ मिनिटांनी महिला विशेष लोकल सुटणार आहे. विरारहून सध्या सकाळी ८.४४ मिनिटांनी सुटणारी महिला लोकल आता सकाळी ८.५६ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.

Story img Loader