लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : रथसप्तमीनिमित्त मुरबाड विधानसभा मतदारसंघात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मंगळवारी सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सुर्यनमस्कार घातले. आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमात बदलापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.

मंगळवारी बदलापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील विविध शाळांमध्ये सकाळपासून सुर्यनमस्कार घालण्यासाठी विद्यार्थांची लगबग सुरू होती. बदलापूर पूर्वेतील आदर्श शैक्षणिक संस्थेच्या भव्य पटांगणात चार वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थी पहाटेपासूनच गोळा होण्यास सुरूवात झाली होती. सकाळी आठच्या सुमारास विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुर्यनमस्कार घातले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने रथसप्तमीच्या मुहुर्तावर एक लक्ष सुर्यनमस्कार उपक्रम हाती घेण्यात आला होता. गेल्या एक महिन्यांपासून सुमारे ११७ महाविद्यालय आणि २५० शाळांमध्ये या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. २०० पेक्षा अधिक प्रशिक्षक एक महिन्यांपासून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सराव करून घेत होते. त्यामुळे मंगळवारी या उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सुर्यनमस्कार घातल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ आणि डॉ. कुकरेजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे कथोरे यांनी सांगितले.

प्रतिक्रियाः राज्य सरकारला विनंती करणार की योग प्रशिक्षणाला शाळांमध्ये मानधनावर शिक्षक नेमण्याची परवानगी द्यावी. ज्यामुळे सशक्त भारत, मजबूत भारत होण्यास मदत होईल. -किसन कथोरे, आमदार, मुरबाड.