टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते २७ गावातील हेदुटणे पर्यंत प्रस्तावित असलेल्या ३१ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील भोपर, आयरे गाव हद्दीत रहिवासी गेल्या सात वर्षापासून रस्त्यासाठी भूसंपादन करुन देत नसल्याने हा महत्वपूर्ण टप्पा रखडण्याची चिन्हे आहेत. भोपर गावात कल्याण डोंबिवली पालिकेचे भूसंपादन अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी सर्व्हेक्षण, मोजणीसाठी गेले की स्थानिक रहिवासी राजकीय मंडळींच्या इशाऱ्यावरुन मोजणी, भूसंपादनाला कडाडून विरोध करत आहेत.
टिटवाळा, गांधारे, बारावे, आधारवाडी, दुर्गाडी, पत्रीपूल ते ठाकुर्ली खंबाळपाडा, चोळे पाॅवर हाऊस, गणेशनगर डोंबिवली, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, मोठागाव, कोपर, आयरे, भोपर, काटई, कोळे ते हेदुटणे असा कल्याण बाह्य वळण रस्त्याचा मार्ग आहे. टिटवाळा ते आधारवाडी पर्यंतचा महत्वाचा वळण रस्त्याचा टप्पा गेल्या वर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधून पूर्ण केला आहे. या प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने ५७८ कोटीचा निधी आठ वर्षापूर्वी मंजूर केला आहे. पालिकेने या रस्त्यासाठी भूसंपादन करायचे आहे. १०० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली की ‘एमएमआरडीए’कडून त्या रस्ते कामासाठी निवीदा प्रक्रिया पूर्ण केली जाते.
हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल
मोठागाव टप्पा रखडला
दुर्गाडी ते मोठागाव या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी पालिकेने ८७ टक्के भूसंपादन पूर्ण केले आहे. सात किमी लांबीचा हा टप्पा आहे. या टप्प्यामुळे डोंबिवली थेट टिटवाळा शहराला जोडली जाणार आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्राधिकरणाने ६६१ कोटीचा निधी मंजूर केला. या रस्ते कामातील १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्या शिवाय आम्ही रस्ते कामाची निवीदा प्रक्रिया सुरू करणार नाहीत, असे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले. टिटवाळा येथे १०० टक्के भूसंपादन नसताना प्राधिकरणाने रस्ते कामे सुरू केली. अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये बांधकामे आहेत. तरीही टप्प्याने प्राधिकरणाने तीन वर्षात कामे पूर्ण केली. आता रस्ते मार्गातील अस्तित्वातील असलेली बांधकामे हटविण्याची कामे पालिकेकडून केली जात नाहीत.
जागा मालक जागेचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. या रस्ते कामासाठी एवढ खर्च करुनही वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल महालेखापालांनी प्राधिकरण आणि पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मोठागाव ते दुर्गाडी टप्यात एकही बांधकाम नसेल तर आम्हीच काम हाती घेतो अशी सडेतोड भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. राजकीय दबाव टाकून हे काम लवकर व्हावे म्हणून स्थानिक पुढारी प्रयत्नशील आहेत. त्याला प्राधिकरण अधिकारी दाद देत नाहीत. रेतीबंदर खाडी किनारी एक मोठा गृहप्रकल्प आकाराला येत आहे. त्या प्रकल्पा जवळून वळण रस्ता जाणार आहे. स्थानिक काही पुढारी घाईघाईने हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाचे ठाण्यात आंदोलन
भोपरमध्ये विरोध
मोठागाव, आयरे, भोपर, शिळरस्ता, कोळे ते हेदुटणे हा आठ किमी लांबीचा वळण रस्त्याचा पहिला आणि दुसरा भाग आहे. मोठागाव ते शीळ रस्ता सहा किमी, शिळ ते हेदुटणे दोन किमीचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्ते मार्गात भोपर येथे काही राजकीय मंडळींचे बंगले, इमारती आणि बेकायदा चाळी आहेत. या भागातील रहिवासी पालिका, भूमी अभिलेख अधिकारी भूसंपादन, मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात गेले तरी स्थानिक रहिवासी विशेष करुन महिला वर्ग आक्रमकपणे पुढे येऊन मोजणी प्रक्रियेत अडथळे आणत आहे. पडद्या मागून बड्या राजकीय मंडळींची स्थानिक लोकांना साथ असल्याने त्यांचे मनसुबे यशस्वी होत आहेत. दोन महिन्यापूर्वी एमएमआरडीएमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठागाव ते हेदुटणे टप्पा काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. भोपर गावातील लोकांना कसे दुखवायचे असा प्रश्न राजकीय मंडळींसमोर असल्याने हा विषय गुलदस्त्यात आहे. पालिका नगररचना अधिकारी याविषयी काही बोलण्यास तयार नाहीत. विकास कामांच्या विषयावर नेहमीच ट्वीटर, फलकयुध्द खेळणारे काही लोकप्रतिनिधी या महत्वाच्या विषयावर गुपचिळी धरून आहेत.