डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, माणकोली उड्डाण पूल भागात खाडी किनारी शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. रात्रीच्या वेळेत हा मलबा गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला जात असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्रीच्या वेळेत हे भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटीचे थोडेफार जंगल असलेला मोठागाव, कोपर, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव पट्टा डोंबिवलीत शिल्लक आहे. या भागातील खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून पर्यावरणप्रेमींचा एक गट या भागात सक्रिय आहे. त्यांनाही खाडी बुजून टाकण्यात आलेले भराव पाहून धक्का बसला आहे. एकीकडे वाळू तस्करांकडून वाळू उपशासाठी खारफुटीची बेसमुर कत्तल मुंब्रा ते डोंबिवली परिसरात करण्यात आली आहे. आता खाडीमध्ये भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. मोठागाव भागात खाडीवर माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतचे काम सुरू आहे. रेल्वे मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. पालिकेचा टिटवाळा ते काटई वळण रस्ता या भागातून जाणारआहे. या भागातील जमिनींचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे या भागातील सरकारी, कांदळवन नियंत्रणाखालील सरकारी जागा हडप करण्यासाठी. या जागांवर बेकायदा गाळे, इमारती, चाळी बांधण्यासाठी भूमाफियांनी मोठागाव खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरू केले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

हे ही वाचा…डोंबिवलीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माणकोली पुलाच्या भागात खासगी, सरकारी अशा दोनच प्रकारच्या जमिनी आहेत. या भागात येत्या काळात पेट्रोलपंप, व्यापारी गाळे, वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा अधिक संख्येने चालतील या विचारातून माफियांनी मोठागाव खाडी किनारच्या जागा हडप करण्याचे षडयंत्र रचले आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात. योग्य नियोजन करून मोठागाव भागातील खाडीकिनारा, खारफुटी नष्ट करून बुजविण्याचे काम सुरू असल्याने पालिका, कांदळवन, महसूल अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करावी. हे कृत्य करणाऱ्या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

गेल्या वर्षी मोठागाव जवळील देवीचापाडा येथील खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांविरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळाच्या तक्रारीवरून चौकशीनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून भूमाफिया दिवसा भराव टाकण्याऐवजी आता रात्रीच्या वेळेत खाडी किनारी भागात मलबा किंवा भराव टाकण्याची कामे करत आहेत, अशा तक्रारी आहेत.

हे ही वाचा…बकरी पालन व्यवसायासाठी माहेरहून २० लाख आणले नाही म्हणून डोंबिवलीत विवाहितेचा छळ

मोठागाव खाडी किनारी खारफुटी नष्ट करून, खाडी किनारा बुजवून कोणी भराव टाकत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल. याप्रकरणी महसूल, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून संंबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील. अतुल पाटील उपायुक्त,घनकचरा विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land mafia attempts to block bay by dumping debris from demolished buildings in dombivli west sud 02