लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात एका भूमाफियाची बेकायदा इमारत तोडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या ताफ्याला मंगळवारी दुपारी अडविण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला. पालिकेला आव्हान देण्यापर्यंत भूमाफियांची मजल गेल्याने त्यांना कोणाचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न बांधकाम क्षेत्रातून उपस्थित केले जात आहेत.
कुंभारखाणपाडा भागात मॉडेल इंग्लिश शाळा आणि दिशांत सोसायटीच्या बाजुला मनोज म्हात्रे, मयूर म्हात्रे आणि मंदार म्हात्रे या भूमाफियांनी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता एक सहा माळ्याची बेकायदा इमारत दोन वर्षापूर्वी उभारली. ही इमारत नियमबाह्य पध्दतीने बांधल्याने भाजपचे नगरसेवक विकास म्हात्रे, माजी नगरसेवक कविता विकास म्हात्रे यांनी पालिकेकडे या बांधकामाच्या तक्रारी केल्या.
ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी ही इमारत तोडली होती. माफियांनी पुन्हा या तोडलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनीही या बांधकामावर कारवाई केली होती. माफिया मनोज म्हात्रे बंधू तोडलेली इमारत पुन्हा उभारत होते.
आणखी वाचा- कल्याणमध्ये मित्र-मैत्रिणीवर अज्ञाताचा चाकुने हल्ला
रस्ते, वाहतुकीला अडथळा ठरणारी ही बेकायदा इमारत तोडावी म्हणून विकास म्हात्रे आग्रही होते. मंगळवारी दुपारी साहाय्यक आयुक्त गुप्ते, पथक प्रमुख विजय भोईर अतिक्रमण नियंत्रण पथक, पोलिसांसह कुंभारखाणपाडा येथील मनोज म्हात्रे यांची बेकायदा इमारत तोडण्यासाठी गेले. तत्पूर्वी कारवाईची कुणकुण लागताच माफिया म्हात्रे बंधूंनी पालिकेचा तोडकामाचा ताफा येण्याच्या मार्गावर तीन ते चार मोटारी आडव्या उभ्या करुन तेथून पळून गेले. काही मोटारींवर ही मोटार बंद आहे. दुपारनंतर ही मोटार काढण्यात येईल, असे कागदी फलक लावले.
रस्त्यात मोटारी
रस्त्यात मोटारी लावल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास झाला. पालिकेचा ताफा दिशांत सोसायटी, मॉडेल इंग्लिश शाळेजवळ गेल्यानंतर त्यांना मनोज म्हात्रे यांच्या बेकायदा इमारतीच्या दिशेने जाण्यासाठीच्या रस्त्यावर मोटारींचा अडथळा उभा केल्याचे दिसले. साहाय्यक गुप्ते यांनी म्हात्रे बंधूंच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनाला पाचारण करुन रस्त्यावरील मोटारी बाजुला केल्या. मनोज म्हात्रे यांच्या बेकायदा इमारतीवर ब्रेकर, घणाचे घाव घातले. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपविजय भवर कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. मनोज म्हात्रेंवर यापूर्वी पालिकेने एमआरटीपीची कारवाई केली आहे.
आणखी वाचा- ग्रामपंचायतीनेच केली २७ लाखांची वीज चोरी
मंत्रालयातून फोन
मनोज म्हात्रे यांची बेकायदा इमारत तोडू नये म्हणून काही पालिका अधिकाऱ्यांना मंत्रालयातून वरिष्ठ पातळीवरून संपर्क करण्यात आला होता, अशी चर्चा पालिकेत आहे.
ग प्रभागात थंडावा
सर्व प्रभागांमध्ये बेकायदा इमारतींच्या विरुध्द जोरदार कारवाई सुरू असताना डोंबिवलीत ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे एकाही बेकायदा इमारतीवर कारवाई करत नसल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आयरेचे रहिवासी तानाजी केणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. वास्तुविशारद संदीप पाटील, माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले, मनोज कुलकर्णी साबळे यांची आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत.
“ ह प्रभागातील बेकायदा इमारतींना अभय दिले जाणार नाही. त्या जमिनदोस्त केल्या जातील. बांधकामधारकांवर एमआरटीपी गुन्हे दाखल करत आहोत.” -सुहास गुप्ते, साहाय्यक आयुक्त