डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद स्वामी समर्थ मठ भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. या भागातून अति चढणीचा असलेला नांदिवली टेकडीचा भाग कमी करून या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे नियोजन आहे. टेकडीच्या चढ-उताराचा भाग कापला तर या भागातील काही भूमाफियांच्या बांधकामांना धक्का बसणार असल्याने, ते या कामात अडथळा आणत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काँक्रिटीकरणाची कामे सुरू असली तरी या रस्त्यांवरील खर्च आणि बांधकामाचे पूर्ण नियंत्रण ‘एमएमआरडीए’चे आहे. पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही. नांदिवली पंचानंद गाव यापूर्वी टेकडी स्वरुपात असलेल्या भागात वसले आहे. गावातील रस्ता टेकडीच्या उतारावरून आहे. या भागातून छोटे अवजड सामान घेऊन जाणारा टेम्पो, काही वेळा दुचाकी या चढणीवरून नेताना चालकाला कसरत करावी लागते. अनेक वेळा टेम्पो अति चढावामुळे मागे येतो. पावसाळ्यात उतारावरून अनेक वेळा वेगाने वाहन येऊन घसरतात. शाळेच्या बस याच मार्गातून येजा करतात.
नांदिवली मधील या चढ-उतरणीच्या रस्त्यामुळे या भागात नियमित अपघात होतात. त्यामुळे या भागातील या रस्त्याचा चढाव कमी करावा म्हणून अनेक वर्षांची या भागातील नागरिकांची पालिकेकडे मागणी आहे. आता काँक्रिटीकरणाचे काम या भागात सुरू आहे. या कामासाठी नांदिवली टेकडीचा काही भाग कमी करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या कामाला एक तथाकथित नेता आणि नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियाने विरोध दर्शविला आहे. टेकडीचा भाग कापला तर या भूमाफिया आजुबाजूच्या बेकायदा बांधकामांना धोका पोहोचणार आहे. त्यामुळे एक माफिया काही दिवसांपासून ठेकेदाराला टेकडीचा चढाव-उतार कमी करण्यास विरोध करत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
डोंबिवलीत नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती सहा वर्षांपूर्वी भूमाफियांनी बांधल्या आहेत. काँक्रीट रस्ते बांधकामाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, नांदिवली टेकडीचा चढ-उतार काढण्यास कोणाचा विरोध नाही. काँक्रीट कामासाठी टेकडीचा काही भाग कमी केला जाणार आहे. विरोध केला तर हा विषय निदर्शनास आणला जाईल.