भारतीय वास्तुविशारद संस्थेचे राजीव तायशेट्ये यांची माहिती
डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अलीकडच्या काळात ५०० हून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांच्या माध्यमातून भूमाफियांनी शासन, पालिका, प्राप्तिकर, वस्तू व सेवा कर, महसूल विभागाचा सुमारे दोन हजार ५०० कोटीचा महसूल बुडविला आहे, अशी माहिती भारतीय वास्तुविशारद संस्था कल्याण शाखेचे सल्लागार, ज्येष्ठ वास्तुविशारद राजीव तायशेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेकायदा बांधकामांच्या विषयावर याचिकाकर्ते संदीप पाटील यांना पोलीस संरक्षण आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय वास्तुविशारद संस्थेने पत्रकार परिषदेचे डोंबिवलीतील गणेश मंदिरात आयोजन केले होते. यावेळी वास्तुविशारद संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास अवचट, वास्तुविशारद शिरिष नाचणे, धनश्री भोसले, नितीन गोखले, संदीप पाटील उपस्थित होते.
सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन एखाद्या विकासकासने अधिकृत इमारत बांधली. या इमारतीचा एक इंच कोपरा इकडे तिकडे झाला तरी नगररचना विभागाचे तत्पर अधिकारी तात्काळ त्या विकासकाला कारवाईची नोटिस बजावतात. अलीकडच्या काळात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विकास आराखड्यातील रस्ते, सेवासुविधांचे आरक्षित भूखंड भूमाफियांनी हडप करुन तेथे टोलेजंग बेकायदा इमारती उभारल्या आहेत. नोटिसा काढणाऱ्या नगररचना, प्रभागातील साहाय्यक आयुक्त, बीट मुकादम यांना ही बेकायदा बांधकामे दिसली नाहीत का, असा प्रश्न वास्तुविशारद तायशेट्ये यांनी केला.
हेही वाचा >>> शिळफाटा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार
ही बांधकामे करताना पालिका, महसूल विभागाच्या बांधकाम परवानग्या माफियांनी घेतल्या नाहीत. त्यामुळे शासनाचा अधिभार, मुद्रांक शुल्काच्या माध्यमातील महसूल बुडाला. वस्तू व सेवाकर, प्राप्तिकर विभागाचा कर बुडविला. अशाप्रकारे माफियांनी पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करुन अलीकडच्या काळातील ५०० बेकायदा इमल्यांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार कोटीचा महसूल बुडविला आहे, अशी धक्कादायक माहिती तायशेट्ये यांनी दिली.
हेही वाचा >>> डहाणू जवळील भीषण अपघातात कल्याण मधील एकाच कुटुंबातील तीन जण ठार
नगररचना अधिकारी सहभागी
बेकायदा इमल्यांची कामे सुरू करण्यापूर्वी माफिया नगररचना, प्रभागातील साहाय्यक आयुक्त यांच्याशी संगनमत करतात. ज्या नगरसेवकाच्या प्रभागात बेकायदा बांधकाम उभे राहते तो नगरसेवकही या कामात सहभागी असतो. बहुतांशी बेकायदा बांधकामांच्या मध्ये पालिका वरिष्ठ, नगररचनाकार, भुकरमापक(सर्व्हेअर) यांचा सक्रिय सहभाग आहे. अनेकांची गुंतवणूक या बांधकामांच्यामध्ये आहे, असे याचिकाकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले. बेकायदा बांधकामांना जबाबदार सर्व पालिका अधिकऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी का केली जात नाही. बहुतांशी बांधकामे नगरसेवक, पंटर, नातेवाईक यांनीच उभारली आहेत, असे तायशेट्ये म्हणाले.
३५० जण अटकेच्या प्रतीक्षेत
पाच वर्षापूर्वी नांदिवली पंचानंद येथे जिल्हा परिषदेच्या बनावट बांधकाम परवानग्या, खोट्या अकृषिक परवानग्यांच्या आधारे शेकडो बेकायदा बांधकामे झाली. या प्रकरणात ७४ आरोपी आहेत. ते सर्व मोकाट आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल आहे. या प्रकरणातील काही आरोपी ६५ बेकायदा इमारती प्रकरणात आरोपी आहेत. आपण इमले उभारले तरी पालिका, पोलिसांकडून काही होत नाही असा गैरसमज भूमाफियांचा झाला आहे. डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात एकूण ३५० माफियांना अटक होणे आवश्यक आहे. दोन महिन्याच्या कालावधीत फक्त १० जण अटक केले आहेत. म्हणजे या प्रकरणाच्या तपासात गडबड आहे. काही आरोपी विशेष तपास पथकाच्या कार्यपध्दतीविषयी संभ्रम निर्माण होईल अशी माहिती पसरवित आहेत. तपास पथकाचा तपास थंडावला आहे का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
“बेकायदा बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या, या बांधकामांत गुंतवणूक करणाऱ्या पालिका, पोलीस अधिकारी, नगररचनाकार, भुकरमापक यांची नावे ईडी, विशेष तपास पथकाला दिली आहेत. त्यांना योग्य वेळी चौकशीचा फास लागेल. अद्याप ३५० जणांना अटक करणे बाकी आहे. त्यांच्यावर तपास पथकाने कारवाई सुरू करावी.”
-संदीप पाटील, वास्तुविशारद
“स्थितीजन्य कागदपत्रांच्या आधारे डोंबिवलीतील बेकायदा इमारत प्रकरणाचा तपास सुरू आहे. या कागदपत्रांच्या छाननीप्रमाणे संबंधितांना अटक केली जाते. तपास योग्य मार्गाने सुरू आहे. आमचे काम निष्ठेने सुरू आहे.”
-अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त -गुन्हे शाखा, ठाणे</strong>