डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील राधाई या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यास पालिका, पोलीस अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या आंदोलनातील भाजपचे अनेक कार्यकर्ते, बेकायदा बांधकामात सहभागी भूमाफिया बुधवारपासून शहरातून पोलीस कारवाईच्या भीतीने पळून गेले आहेत. बेकायदा इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची यादी जमीन मालक जयेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि मानपाडा पोलिसांना देण्यास तयार केली आहे. या यादीत आपली नावे येऊ नये म्हणून काही भूमाफिया नातेवाईकांच्या माध्यमातून जयेश म्हात्रे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांशी भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला इमारत तोडण्यास विरोध करायचे आहे हे माहिती नव्हते, अशी सारवासारव करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपच्या बहुतांशी महिला पदाधिकाऱ्यांनी चुकीचे निरोप चुकीच्या प्रकरणातील आंदोलनासाठी देऊन सहभागी करून घेतल्याबद्दल निरोप देणाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनात सहभागी असणारे बहुतांशी भूमाफिया यापूर्वी पोलीस ठाण्यातील कोठडी, तुरूंगात जाऊन आले आहेत. काही जण पोलिसांना पाहिजे आहेत. बेकायदा राधाई इमारतीच्या समोर हेच भूमाफिया पालिका आणि पोलीस कारवाईला मंगळवारी विरोध करत होते. हे पोलिसांनीही पाहिले आहे. त्यामुळे पोलीस आपल्यावर नजर ठेऊन आहेत याची जाणीव झाल्यापासून बुधवारपासून अनेक भूमाफिया, भाजपशी संबंधित काही कार्यकर्ते आपल्या मूळ गावी, काही जण आपल्या सातारा, मुरबाड परिसरातील शेतघरावर पळून गेले आहेत. भाजपच्या एका विश्वसनीय सुत्राने या वृत्ताला दुजोरा दिला.

हे ही वाचा… बदलापूरकरांना जलदिलासा, २६० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारची मंजुरी

राधाई इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्यांची छायाचित्रे, दृश्य ध्वनीचित्रण पोलीस, याचिकाकर्त्यांनी करून ठेवले आहे. ही सगळी छायाचित्रे, दृश्यध्वनीचित्रण आपण मानपाडा पोलीस, उच्च न्यायालया देणार आहोत, असे याचिकाकर्ते जयेश म्हात्रे यांनी सांगितले. पोलिसांनीही राधाई इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची ओळख पटविण्यास सुरूवात केल्याचे समजते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मानपाडा पोलिसांना संपर्क करून राधाई बेकायदा इमारतीचे प्रकरण न्यायालयीन असल्याने या प्रकरणात हयगय न करता या प्रकरणातील दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

भाजप प्रवेशासाठी नाटक

जमीन मालक जयेश म्हात्रे यांच्या जमिनीवर नांदिवलीतील एका माजी सरपंच महिलेने आपल्या पदाचा दुरूपयोग करून राधाई सात माळ्याची इमारत चार वर्षापूर्वी उभारली. ही महिला यापूर्वी शिंदे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती होती. राजकीय आशीर्वादाने या महिलेने मागील चार वर्ष राधाई इमारत तोडण्यापासून वाचवली. यापूर्वी ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दोन वेळा राधाई इमारत तोडण्यासाठी मानपाडा पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. पोलिसांनी नकार दिला होता.

हे ही वाचा… ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ

शिवसेनेने या महिलेला आता बेकायदा इमारतीसाठी सहकार्य करण्यास नकार दिला. या महिलेने तात्काळ भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली बेकायदा राधाई इमारत वाचवली तर आपण भाजपमध्ये प्रवेश करू अशी अट घातली. त्यामुळे भाजप पदाधिकारी राधाई इमारती बाहेर जमले होते, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठाने दिली. राधाई प्रकरणाने या इमारतीजवळ आठ बेकायदा इमारती उभारणारे माफिया अडचणीत येणार आहेत.