काम युद्धपातळीवर; वारली हाट, ट्रॉमा केअर सेंटरचीही उभारणी
पालघर जिल्हा स्थापून साडे चार वर्षे झाली असली तरी अद्याप जिल्हा मुख्यालयाची प्रशासकीय इमारत नव्हती. या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून २०१९मध्ये पालघरकरांना जिल्हा मुख्यालयाची भेट मिळणार आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वारली हाट आणि ट्रॉमा केअर सेंटरचे कामही सुरू असून नव्या वर्षांत ही कामे पूर्ण होणार आहे.
पालघर जिल्ह्याची स्थापना १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली असून जिल्हा मुख्यालयाचे कामही वेगाने सुरू आहे. सिडकोला हे काम देण्यात आले असून २०१९मध्ये ते पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नव्या वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच दोन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व कार्यालयांचे बांधकाम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असले तरी त्याला दोन ते तीन महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता आहे. इमारतीचे काम सुरू असताना कार्यालयाच्या फर्निचर अर्थात इंटिरियर कामांच्या निविदा काही दिवसात निघण्याच्या स्थितीत असून अंतर्गत फर्निचरचे कामदेखील बांधकामाच्या बरोबरीने सुरू ठेवण्याचा मनोदय सिडकोचे अधिकारी व्यक्त करत आहेत. २०१९ डिसेंबरपूर्वी पालघरचे जिल्हा मुख्यालय नवनगर येथे स्थित वास्तूमध्ये स्थलांतरित होण्याचा सिडकोचा मानस आहे.
स्थानिक आदिवासींकडून तसेच हस्त कलाकारांकडून तयार करण्यात आलेल्या आदिवासी पारंपारिक पदार्थ, हस्तकला वस्तू आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून म्हणून येथे वारली हाटची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे. या वारली हाटसाठी नियोजन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून याकामी निविदा काढणे आणि प्रत्यक्ष उभारलेला सुरू होण्याचे २०१९मध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबरीने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटरचे काम मनोर येथे सुरू करण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली आहे.
कामे वेगाने
- पालघर शहरांमध्ये अनेक प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असून ते काम यंदा पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- जिल्ह्याने कुपोषण मुक्तीचा निर्धार व्यक्त केला असून माता- बालकांच्या आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
- २०१९मध्ये अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण बनवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील राहणार आहेत.
- जिल्ह्यामध्ये ४१ हजार वनपट्टय़ांचे वितरण करणे अपेक्षित असताना त्यापैकी १४ हजार वनपट्टय़ाचे वितरण करणे अद्याप शिल्लक आहे.
- हे काम फेब्रुवारीअखेरीस पूर्ण करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.