उल्हासनगर: शहरातील कॅम्प दोन भागात रात्रीच्या वेळी साईबाबा मंदिराजवळ दोन युवक मोठ्या प्रमाणात एमडी या अमली पदार्थांचा सौदा करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत तब्बल ५८.१ ग्रॅम एमडीसह दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारातील किंमत तब्बल ११ लाख ९४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे शहरात अमली पदार्थ विक्रीचा प्रकार अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना गुप्त बातमीदाराकडून एक खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री साडे ११ च्या सुमारास उल्हासनगर कॅम्प २ मधील साईबाबा मंदिराजवळ दोन युवक एमडी या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार होते. पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. सापळा रचून पोलिसांनी दिलेल्या ठिकाणी दबा धरला. काही वेळातच संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. पोलिसांनी त्या दोघांना घेरले आणि झडती घेतली असता त्यांच्याकडून ५८.१ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
यावेळी पोलिसांनी आरिफ मोहम्मद शरीफ खान (२१, रा. रामकिसन करोतीया नगर, उल्हासनगर-३) आणि सफिकुर रेहमान सिराज अहमद खान (२२) या दोघांना अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनी ही अमली पदार्थ कुठून आणले आणि कुठे विक्री करणार होते याची माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांचा या अमली पदार्थ जाळ्याबद्दल सखोल तपास सुरू केला आहे. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असुन ही विक्री त्याचाच एक भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.