डोंबिवली – देशातील हिंदू बांधवांचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम सोमवारी अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. त्याचे औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात १ लाख ११ हजार १११ अधिक दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची दिव्य आणि तेजस्वी अशी प्रतिकृती साकारण्यात आली. याची दखल घेत याची ऑल इंडिया रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय
दिव्यांची रांगोळी
सावळाराम महाराज क्रीडांगणात अयोध्या मंदिरासह श्रीरामाचे सर्वात मोठे चित्र काढण्यात आले आहे. १६० फूट रुंदी १६० उंची, एकूण २५ हजार ६०० चौरस फूट मध्ये १ लाख ११ हजार ११ तेलाचे दिवे आकर्षक पध्दतीने मांडून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रांगोळी कलाकार चेतन राऊत आणि शिवसेना युवा टीम सदस्यांनी हे पोर्ट्रेट डिझाइन केले होते. प्रभू श्रीरामांसह मंदिराचीही अतिशय सुंदर अशी प्रतिकृती दिव्यांतून साकारण्यात आली आहे. प्रभू श्रीरामांच्या काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीवर हे दीप प्रज्वलन करण्यात आले. या अनोख्या तेजस्वी सोहळ्याचे शेकडो रामभक्त आणि डोंबिवलीतील सामाजिक संस्थांच्या अनेक प्रतिनिधींना याची देही याची डोळा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. गीत रामायणातील अवीट गोडींच्या सुमधुर सुर आणि दुसरीकडे हे लक्ष दिवे प्रज्वलित करण्यासाठी उसळलेला रामभक्तांचा जनसागर. संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील शेकडो रामभक्तांची पावले संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलाकडे वळू लागली होती.
या भव्य दिपोत्सवाप्रमाणे याठिकाणी झालेल्या महाआरतीनेही उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या महा आरतीसाठी वाराणसीच्या काशी येथील 32 ब्रह्मवृंदांची उपस्थिती होती. अयोध्येत उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या माध्यमांतून आपली संस्कृती आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम होईल, असा विश्वास यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.