प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
विरार : मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा भाईंदर येथील एका पंचतारांकित हॉटेलला लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटने मेल पाठवून घातपात करण्याची धमकी देत १०० बीट कॉईनची खंडणी मागितली आहे. या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बुधवारी सकाळी मीरारोड परिसरात असलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पंचतारांकित ‘सेव्हन इलेव्हन स्क्वेअर’च्या ‘इमेल’वर लष्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या व्यवस्थापकाने याबाबत मालक नरेंद्र मेहता यांना माहिती दिली. नरेंद्र मेहता त्यांनी त्वरित पोलिसांना हा ‘इ मेल’ दाखवला.
‘इ मेल’मधील तपशील इंग्रजी भाषेत असून, ‘आम्ही लष्कर-ए-तोयबा असून पाकिस्तान आणि खिलाफतचे समर्थक आहोत. आमचा शहीद पुढील २४ तासांच्या आत हॉटेलमध्ये स्फोटके घेऊन दाखल होईल आणि मोठा रक्तपात करेल, हे ऑपरेशन जर तुम्हाला थांबवायचे असेल तर आमच्या खात्यावर १०० बीट कॉईन, म्हणजे ७ कोटी जमा करा. २४ तासांच्या आता जर पैसे मिळाले नाहीत आणि आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये स्फोटके पेरण्यास असमर्थ ठरलो तर हॉटेलमधील ग्राहकांना बंदी बनवून लहान मुलांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि कर्मचाऱ्यांना मारून टाकू. तुमच्या मालकाला सांगा हा विनोद नाही, घातपात झाल्यास तुम्ही जबाबदार असाल. आम्ही अल्लाहच्या नावाखाली मारायला तयार आहोत, आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही.’ अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे.
ती ‘अफवा’ : ‘पश्चिम उपनगरातील चार पंचतारांकित हॉटेलमध्ये घातपाती कारवाई घडवू’, ही धमकी अफवा ठरवली. धमकीच्या ‘इ-मेल’मध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा उल्लेख असल्याने हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांमध्ये धाकधूक होती. मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही हॉटेलचा कानाकोपरा प्रशिक्षित श्वानांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने धुंडाळला. मात्र संशयास्पद वस्तू आढळली नाही.