ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या गाडीला नवसंजीवनी देण्यात आली आहे. २००१ मध्ये याच गाडीतून प्रवास करताना आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने तब्बल २१ वर्षांनंतर ही गाडी खारटन रोड येथील शक्तीस्थळ मैदानात उभी करण्यात आली आहे. या गाडीबरोबर छायाचित्र काढण्यासाठी शिवसैनिक गर्दी करू लागले आहेत.
ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचा दरारा होता. त्यांचा शब्द ठाण्यातील शिवसेनेत अंतिम मानला जात होता. त्यांची सर्वात आवडती गाडी मिहद्रा अर्माडा ही होती. या गाडीतून दिघे हे दिवस-रात्र संघटना वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत असत. ऑगस्ट २००१ मध्ये ठाण्यातील वंदना टॉकीज येथे एसटीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत त्यांचे निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आजही आनंद दिघे यांचे नाव घेताच आठवणी दाटून येतात. या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. गेल्या २१ वर्षांपासून घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका वाहन दुरुस्ती केंद्रात उभ्या असलेल्या आनंद दिघे यांची गाडी पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न
ही गाडी दुरुस्त करणाऱ्या अभिषेक चव्हाण, विनायक नगर आणि योगेश बनसोडे यांनी सांगितले की, अनेक वर्ष आमच्या गॅरेजमध्ये उभी होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० दिवसांत ही गाडी दुरूस्त करण्याची सूचना आम्हाला दिली होती. अर्माडा गाडीचे भाग मिळविण्याचे मोठे आव्हान होते. कोल्हापूर येथून गाडीचे हे भाग आम्ही गोळा केले. अवघ्या २८ दिवसांमध्ये ही गाडी आम्ही पुन्हा नवी कोरी केली. ही गाडी आता ठाणे शहरातील रस्त्यावर धावत असल्याचे त्यांनी सांगितले.
या गाडीतून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही आनंद दिघे यांच्यासोबत प्रवास केला आहे. नव्याने दुरूस्त केलेल्या या गाडीमध्ये आनंद दिघे यांचा केशरचना करण्याचा कंगवा त्याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच गाडीत बसल्यावर आनंद दिघे नेहमी वृत्तपत्र वाचत असत.
वृत्तपत्र वाचण्यासाठी गाडीमध्ये एक विशिष्ट दिवा होता. तो दिवाही या दुरूस्त केलेल्या गाडीत आहे. गाडीचा एमएच ०५ जी २०१३ हा वाहन क्रमांक तसाच ठेवला आहे. २०१३ हा आनंद दिघे यांच्या आवडीचा क्रमांक होता. असे आनंद दिघे यांचे वाहन चालक गिरीश शिलोत्री यांनी सांगितले.
आणि जीव वाचला..
आम्ही मिरारोड येथे गेलो असताना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीचे गुंड आमचा पाठलाग करत असल्याची कुणकुण आनंद दिघे यांना लागली होती. वाहनाचा वेग वाढवित मी तात्काळ ही गाडी पोलीस ठाण्यात नेली. आमचा जीव या गाडीमुळे वाचल्याचे गिरीश शिलोत्री यांनी सांगितले.