कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने कार्यालयात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेळेवर येण्याचा फतवा काढला असून उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कायम लेटलतीफ म्हणून धन्यता मानणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांना आता वेळेत येऊन आपापली कामे पार पाडावी लागणार आहेत.
बदलापूर पालिकेत अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सूचना फलकावर एक सूचना लावण्यात आली असून त्या सूचनेत लेटलतीफ कर्मचाऱ्यांसाठी काही इशारेवजा सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्य शासनाच्या कार्यालयात वेळेत उपस्थित राहण्यासाठीच्या १९८८ व १९९२ सालच्या दोन शासन निर्णयांचा आधार घेण्यात आला आहे. तसेच पालिकेतील कर्मचारी, अधिकारी व अभियंते कामकाजाकरिता पालिकेच्या बाहेर जात असतात, परंतु याबाबत वरिष्ठांना कळवत नसल्याचे या सूचनेत स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. शिस्त लागावी म्हणून ही सूचना प्रसिद्ध करीत असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सध्या पालिकेत कर्मचारी वेळेवर येताना दिसत आहेत.
काय आहे सूचना ?
’२४ मे २०१५ पासून कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात हजेरी नोंदविण्यासाठी ३० मिनिटांचा ग्रेस पीरियड देण्यात आला आहे.
’अधिकारी व कर्मचारी सकाळी ९.४५ ते १०.१५ या वेळेत जितकी मिनिटे उशिराने येतील, तितकी मिनिटे सायंकाळी ५.४५ नंतर थांबून काम करणे आवश्यक आहे.
’ज्या वेळेस वरिष्ठ अधिकारी सकाळी लवकर किंवा ९.४५ ला हजर राहण्याची सूचना करतील, ती पाळणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे.
’कर्मचाऱ्यांनी दररोज ७.४५ तास काम करावे, परंतु तातडीची बैठक, निवडणूक, न. प. बैठका, महत्त्वाची कामे करण्यासाठी जास्त वेळ थांबणे बंधनकारक आहे.
’अधिकारी, अभियंते, आरोग्य निरीक्षक, क्षेत्रीय कर्मचारी आदींनी कार्यालयीन वेळेत वरिष्ठ कार्यालयात जाताना अथवा क्षेत्रीय कामकाजासाठी जाताना वरिष्ठांना अथवा विभागप्रमुखांना कळवणे बंधनकारक असून आऊटडोअर रजिस्टरमध्ये नोंदणे आवश्यक आहे.
’तसेच वेळेवर येऊन शिस्त पाळावी आणि जास्त कामासाठी थांबून काम करून सेवा कायद्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा करण्यात आलेली आहे.

Story img Loader