नीलेश पानमंद
शहरातील ५० चौकांत वास्तविक वेळेनुसार काम करणारी यंत्रणा बसवणार
ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ५० चौकांमध्ये वास्तविक वेळेवर आधारित अशी अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे चौकातील वाहनांच्या वर्दळीनुसार वाहतुकीचे नियोजन होणार आहे.
ठाणे शहरातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून त्या मानाने शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने काही भागांतील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण केले असले तरी, सिग्नल यंत्रणेच्या अभावामुळे वाहतुकीत सुसूत्रता व शिस्त आणण्यात अपयश येत आहे. या पाश्र्वभूमीवर वास्तविक वेळेवर आधारित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या ठाणे शहरातील चौकांमधील वाहतुकीचे नियोजन निर्धारित वेळेवर आधारित असलेल्या सिग्नल यंत्रणेवर करण्यात येत असून त्यासाठी चौकाचौकांमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असतात. निर्धारित वेळेवर आधारित असलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे ठरावीक वेळेतच वाहनांना चौकातून वाहतूक करण्यास प्रवेश मिळतो. उर्वरित वेळेत ही वाहने चौकांमधील मार्गावर रोखून धरली जातात. त्यामुळे काही मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागतात, तर काही मार्गावर वाहनांची संख्या कमी असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई आणि बेंगळूरुच्या धर्तीवर वास्तविक वेळेवर आधारित असलेली अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली चौकांमध्ये बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे शहरातील २७ चौक आणि प्रस्तावित नवीन २३ चौक अशा एकूण ५० ठिकाणी ही अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा ठाणे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष आणि ठाणे महापालिकेच्या हाजुरी येथील नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीला संचलन, सुधारणा, देखभाल, व्यवस्थापन, दुरुस्तीचे काम तीन वर्षांसाठी दिले जाणार आहे.
यंत्रणा अशी काम करणार
* ठाणे शहरातील चौकांमधील वाहनांच्या वर्दळीचा अभ्यास गुगल मॅप तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरणाद्वारे केला जाणार आहे.
* या अभ्यासानंतर चौकांमध्ये अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे.
* ज्या मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असेल त्या मार्गावरील वाहतुकीसाठी सिग्नल जास्त वेळ सुरू असेल. जेव्हा एखाद्या मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी होईल, तेव्हा सिग्नलच्या वेळा कमी होतील.