ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे मत
स्वत:ला हसणे, स्वत:चे उन्नयन करणे हाच विनोद सर्वात श्रेष्ठ असून दुसऱ्यांना हसून केलेला विनोद श्रेष्ठ नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले. ग्रंथसखा वाचनालयातर्फे आयोजित व ग्रंथाली प्रकाशित हसिक-रसिक या विनोदी कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. अमेरिकास्थित लेखिका प्रगती कोळगे यांच्या या चौथ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला सहलेखक व व्याख्याते प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, महाराष्ट्र भाषा सल्लागार समितीचे सदस्य अरुण जोशी, ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी, उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका डॉ. लतिका भानुशाली यांनी केले.
या विनोदी कथासंग्रहाच्या प्रकाशनावेळी बोलताना सासणे म्हणाले की, भारतात विनोदाची प्राचीन परंपरा आहे. सकाळी उठून उद्यानात जाऊन हसण्यापेक्षा निर्मळ विनोदाने हसणे आनंददायी आहे. हा कथासंग्रह लिहिताना कोळगे यांनी सूक्ष्म व साध्या शैलीने पुस्तकाचे लेखन केले असून यात त्यांची निकोप वृत्ती दिसून आली आहे. अशा निकोप वृत्तीतूनच हे उत्तम विनोदी लेखन झाले आहे. या कथासंग्रहात अनेक सौंदर्यपूर्ण प्रसंग असून सूक्ष्म निरीक्षण, भाषिक ज्ञान, आकलन या जोरावर हे पुस्तक परिपूर्ण झाले असून लेखिकेने लवकरच विनोदी कादंबरीकडे वळावे, अशी माझी विनंती आहे, असे ते म्हणाले. या वेळी प्रगती कोळगे यांनी ग्रंथालीकडून प्रेरणा घेत लेखन केले असून माझ्या आजारपणात लिखाणाने मला साथ देत मला संजीवनी दिल्याचे सांगितले. अमेरिकेतून समाज माध्यमांमधून भारतीयांशी संवाद साधण्याचे त्यांचे अनुभव या वेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे वक्ते प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, कोळगेंच्या कथासंग्रहातील विनोद हा बोचकारणारा नसून गुदगुल्या करणारा आहे. विनोद बुद्धी संपणं हे समाजाचे खच्चीकरण करणारे लक्षण असून या हसिक-रसिक पुस्तकाने समाजातील मने निखळ हास्याने खुलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी कोळगे व जोशी हे पेशाने अभियंते असून दोघेही मराठवाडय़ातील असल्याने जोशी म्हणाले की, ही मराठवाडय़ाची धूळ आहे व ती साहित्य विश्वाला नक्की व्यापून टाकेल. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी नांदेडमधील एका संमेलनात आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांच्यात मराठवाडय़ातील धुळीच्या रस्त्यांवरून घडलेला रंजक किस्सा रसिकांना सांगितला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्याम जोशी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा