ठाणे : बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यावरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला असून याच घटनेचा प्रसंग अक्षय चे वकील अमित कटारनवरे यांनी शनिवारी पुन्हा उभा केला. त्यावेळी समोर आलेल्या बाबींच्या नोंद करत त्या न्यायालयात मांडून या प्रकरणाचा लवकरच उलगडा करणार असल्याचा दावा अमित यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळ सहा कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला असून यानंतर विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तर, सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची पाठराखण केली होती. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी शनिवारी सायंकाळी तळोजा ते मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि तेथून पुढे कळवा रुग्णालय असा प्रवास करून त्या दिवशीच्या घटनेचा प्रसंग पुन्हा उभा केला. यामध्ये पोलिसांनी तक्रारीत नोंदविलेली वेळ आणि घटनाक्रम याची तपासणी करून त्यांची नोंद केली. याशिवाय मुंब्रा बाह्यवळण मार्गालगत असलेल्या टपरी चालकांकडे त्यांनी त्यादिवशीच्या घटनेबाबत विचारपूस केली. यानंतर ते कळवा रुग्णालयात गेले आणि तिथे चौकशी करून माहिती घेतली. तिथेच त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

हेही वाचा >>> उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी तक्रारीत नोंदवलेली वेळ, घटनाक्रम याचा प्रसंग पुन्हा उभा केल्यावर मला किती वेळ लागला आणि काय नोंद केले, ही सर्व माहिती न्यायालयात मांडणे उचित ठरेल. आता उघड केले तर त्याचा फायदा माझ्या आशिलाला होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा लवकरच करेन, अशी प्रतिक्रिया वकील अमित यांनी दिली. मला ज्या ज्या गोष्टी आढळल्या आणि ज्या ज्या गोष्टी सत्य आहेत ,त्या न्यायालयात मांडण्यासाठी त्याचा पुरावा गोळा करण्यासाठी हे करत आहे. आमचा लढा पोलीस राजविरोधात आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा पोलिसीराज कदापि खपवून घेणार नाही. आम्ही सगळे वकील मिळून याचा मुकाबला करू, असे सांगत न्यायालयातूनच न्याय हा मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पोलीसच न्यायाधीश बनतील हे कदापि खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.