कल्याण– रेल्वेमध्ये आपल्या मुलाला तिकीट तपासणीस म्हणून लावतो असे सांगून येथील एका वकिलाने एका रहिवाशाची आणि आणखी एका तरुणाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत वकिलाने दोघांकडून नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे सहा लाख रुपये उकळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॲड. कैलास शंकर जाधव (४४, रा. गुरु आत्मन सोसायटी, गौरीपाडा, योगीधाम समोर, कल्याण. मूळ राहणार रायता, ता. कल्याण) असे फसवणूक करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर मधील साहिल प्लाझामध्ये राहणारे सुखदेव पाटोळे (६१) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ॲड. कैलास जाधव यांच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक यु. व्ही. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा >>> मोठागाव-माणकोली पूल खुला झाल्यानंतर, डोंबिवलीत माणकोली पूल ते कोपर पूल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास प्रतिबंध

कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले, आरोपी ॲ्ड. कैलास जाधव यांनी तक्रारदार सुखदेव पाटोळे यांच्याशी संपर्क करुन मी तुमच्या मुलाला रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून लावतो. तेथे आपली ओळख आहे असे सांगितले. मुलाला सहज नोकरी मिळते म्हणून सुखदेव यांनी आपल्या मुलासाठी तीन लाख रुपये ॲड. कैलास यांना दिले. याशिवाय अन्य एका तरुणाने याच कामासाठी कैलास यांना तेवढेच पैसे दिले. पैसे दिल्यानंतर सुखदेव आणि अन्य एका तरुणाने नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याची मागणी ॲड. कैलास यांच्याकडे सुरू केली. विविध कारणे देऊन ते टाळाटाळ करत होते. दोन वर्ष उलटली तरी आपणास नोकरीचे नियुक्ती पत्र नाही आणि दिलेले पैसे परत करा म्हणून सुखदेव वकिलाकडे मागणी करत होते. ते पैसेही तो परत करत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक ॲड. कैलास जाधव यांनी केली आहे, याची खात्री पटल्यावर सुखदेव आणि अन्य एका तरुणाने जाधव यांच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer cheated two person for rs 6 lakh in kalyan over job promise zws
Show comments