कल्याण – मुंबईतील बोरिवली येथील बार असोसिएशनचे सदस्य ॲड. पृथ्वीराज झाला यांना कांदिवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा निषेध आणि संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ पोलीस सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी कल्याण जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी न्यायालयाबाहेर निदर्शने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, सचिव ॲड. चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या निदर्शनांमध्ये वकील संघटनेचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. वकिलांसाठीचा संरक्षण कायदा मंजूर झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा – नववर्ष स्वागत यात्रा : डोंबिवलीत २८० नृत्यांगनांकडून श्रीरामाच्या जीवनावरील नृत्याविष्कार

हेही वाचा – नोकरीच्या आमिषाने कल्याणमधील रिक्षा चालकाची कोल्हापूरच्या भामट्याकडून फसवणूक

ॲड. जगताप यांनी सांगितले, बोरिवली बार असोसिएशनचे सदस्य ॲड. पृथ्वीराज झाला पक्षकाराला घेऊन कांदिवली पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते या अधिकाऱ्याने कसलीही चौकशी न करता ॲड. झाला यांना पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. तुम्ही कोणत्याही वकिलाला घेऊन या मी नाही घाबरत, अशी धमकी ॲड. झाला यांना गिते यांनी दिली. या घटनेने ॲड. झाला अस्वस्थ झाले. वारंवार वकिलांवर हल्ले होत आहेत. आता तर कायद्याचे रक्षक मारहाण करू लागले तर न्याय मागायचा कोणाकडे, असे प्रश्न निर्माण झाल्याने शुक्रवारी वकिलांनी ॲड. झाला प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला, असे ॲड. गणेश पाटील यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyers protest in kalyan to protest agasint beating of lawyer ssb