कडोंमपा आयुक्तांकडून महिन्याची मुदत; व्यापारी, भाजी विक्रेत्यांना शिस्त

कल्याणातील शिवाजी चौकालगत असलेला लक्ष्मी बाजार म्हणजे जणू अस्वच्छतेचे आगार. सडलेल्या भाज्या, सर्वत्र पसरलेली घाण, दरुगधी यामुळे या भागातून चालणेही ग्राहक आणि प्रवाशांना नकोसे होते. बेकायदा बाजार भरवूनही तोऱ्यात वागायचे आणि संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य उभे करणारे व्यापारी गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई.रवींद्रन यांनी दिलेल्या दणक्यामुळे सुतासारखे सरळ आले आहेत. महिनाभरात स्वच्छता ठेवा अन्यथा कारवाईला तयार राहा, असा सज्जड दम रवींद्रन यांनी भरला होता. त्यांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून ‘स्वच्छ लक्ष्मी मार्केट’ अभियान हाती घेतल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

येथील व्यापारी संघटनांच्या पुढाकाराने जागोजागी लहान कचराकुंडय़ा, डबे ठेवण्यात आले आहे. भाजी बाजारात निर्माण होणारी घाण या कुंडय़ामध्ये नियमितपणे टाकली जाऊ लागली आहे. शिवाय महापालिकेची घंटागाडी येताच व्यापारी पुढाकार घेऊन कचरा सफाई कामगारांच्या हवाली करताना दिसू लागले आहेत. रवींद्रन यांच्या दट्टय़ामुळे झालेला हा बदल कल्याणकरांना सुखावणारा ठरत आहे.

दरम्यान, महापौरांनीही लक्ष्मी बाजार परिसरासाठी चाळीस कचऱ्याचे ड्रम पुरविणार असल्याचे आश्वासन या वेळी दिले. एका आठवडय़ात दोनदा लक्ष्मी बाजारात स्वच्छता मोहीम राबविली गेल्याने या ठिकाणी फळ-भाजी विकत घ्यायला येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला.

लक्ष्मी बाजारामध्ये प्रवेश केल्यानंतर फळ-भाज्यांच्या चिखलातून वाट काढत ग्राहकांना फळ-भाज्यांची खरेदी करावी लागते. परंतु ई. रवींद्रन यांच्या कारवाईच्या बडग्यामुळे बाजारातील फळ-भाजी विक्रेते स्वच्छतेकडे लक्ष पुरवू लागले आहेत, असे या भागातून नियमित फेरफटका मारणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेमुळे बाजार परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्यात काही प्रमाणात का होईना घट झालेली पाहायला मिळत आहे. लक्ष्मी बाजारातील रस्त्यात साचलेल्या फळ-भाज्यांच्या चिखलामध्ये सर्वाधिक कचरा कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांचा असतो. कोबी आणि फ्लॉवरचा हा कचरा लक्ष्मी बाजाराजवळील तबेलेवाले आपल्या गुरांच्या तबेल्यात नेतात. कोबी आणि फ्लॉवरचा हा कचरा उचलला गेल्याने बाजारामध्ये काही प्रमाणात स्वच्छता पाहायला मिळत आहे. लक्ष्मी बाजारातील फळ-भाजी विक्रेते भाज्यांचा हा कचरा आपल्या दुकानासमोरच टाकतात, परंतु पालिकेच्या बडग्यानंतर हे विक्रेते हा कचरा आपल्या दुकानाच्या अखत्यारीतच जमा करत आहेत.

व्यापारी नरमले..

कल्याणचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या शिवाजी चौकातील लक्ष्मी बाजार परिसरात होणारी वाहतूक कोंडी, अस्वच्छता आदी समस्यांवर कडक भूमिका घेत रवींद्रन यांनी मध्यंतरी हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. रोजगाराचे साधन धोक्यात येताच खडबडून जागे झालेल्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाविरोधात संपाचे हत्यार उपसले. रवींद्रन यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता. मात्र, रवींद्रन काही बधले नाहीत. या प्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मध्यस्थी केल्याने लक्ष्मी बाजारातील फळ-भाजी विक्रेत्यांना काही अटींवर व्यापाऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली. दबाव आणूनही आयुक्त काही जुमानत नाहीत हे लक्षात येताच या बेकायदा बाजारातील काही मुजोर व्यापारी आता सुतासारखे सरळ येऊ लागले असून नुकतेच या बाजारात बाजार परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

Story img Loader