गेल्या दोन दशकांत मुख्य ठाणे शहरापासून दूर अनेक वसाहती उभ्या राहिल्या. जुन्या शहराच्या तुलनेत हे नवे ठाणे अधिक सुनियोजित आणि सुटसुटीत आहे. या नव्या ठाण्यातील एक वसाहत म्हणजे लोकमान्यनगर येथील ‘लक्ष्मी पार्क फेज-२’. ठाणे रेल्वे स्थानकापासून साधारण पाऊण तासांच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत ५६५ ते ८५० चौरस फुटांच्या ३०५ सदनिका आहेत. सर्व जाती धर्माचे लोक या वसाहतीत गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक इमारतीची एक स्वतंत्र समिती आहे. इमारतीमधील सर्व धोरणात्मक निर्णय या समित्या घेतात.
गे ल्या दोन दशकांत ठाणे शहराचा परीघ बराच विस्तारला आहे. चाळिसेक वर्षांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली. लोकमान्यनगर ही त्यातील एक प्रमुख वस्ती. या वस्तीतील पहिली सुनियोजित वसाहत म्हणजे लक्ष्मी पार्क. फेज १ आणि २ असे या वसाहतीचे दोन विभाग आहेत. दोन्ही फेज एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. मात्र एकाच विकासकाने बांधल्याने त्या लक्ष्मी पार्क याच नावाने ओळखल्या जातात. लक्ष्मी पार्क फेज-२ मध्ये पाच इमारती आहेत. त्यातील इमारत क्र. १, २ आणि ५ सात माळ्यांच्या तर ३ आणि ४ क्रमांकाच्या इमारती प्रत्येकी नऊ माळ्यांच्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानकापासून साधारण पाऊण तासांच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत ५६५ ते ८५० चौरस फुटांच्या ३०५ सदनिका आहेत. सर्व जाती धर्माचे लोक या वसाहतीत गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक इमारतीची एक स्वतंत्र समिती आहे. त्या समितीतील एकेक सभासद लक्ष्मी पार्क फेडरेशन या समुच्यय समितीमध्ये आहे. वसाहतीविषयक सर्व धोरणात्मक निर्णय ही समुच्चय समिती घेते. सर्व रहिवाशांना ते धोरण बंधनकारक असते. वसाहतीत साधारण सातशे लोक राहतात. त्यात महाराष्ट्रीयांप्रमाणेच दाक्षिणात्यांची संख्याही लक्षणीय आहे.
सुसज्ज उद्यान, मुबलक पाणी
वसाहतीत प्रवेश करताना समोरच मुलांसाठी सुसज्ज असे उद्यान उभारण्यात आले आहे. विविध शोभेच्या झाडांनी तसेच फुलझाडांनी सजवलेल्या या उद्यानामुळे वसाहतीच्या दर्शनी भागाला निराळीच शोभा प्राप्त झाली आहे. प्रत्येक इमारतीची स्वतंत्र अशी कूपनलिका आहे. त्यामुळे परिसरातील इतर सोसायटय़ांच्या तुलनेत येथील पाण्याची व्यवस्था बऱ्यापैकी आहे. लक्ष्मी पार्कवासी कूपनलिकेचे पाणी केवळ स्वच्छतागृहासाठी वापरतात. ठाणे महानगरपालिकेकडून येणारे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. २४ तास पाणीपुरवठा असल्याने वसाहतीत पर्जन्य जलसंधारण योजना अस्तित्वात नाही. सतर्क सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही यंत्रणा मात्र आहे. वसाहतीत रहिवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
वसाहतीमधील अग्निशमन यंत्रणाही चांगल्या अवस्थेत कार्यान्वित आहे. वसाहतीच्या आवारातील उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहेत. येथील नेत्रसुखद हिरवळ बघता क्षणीच दिलासा देऊन जाते. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक तसेच गृहिणी येथे सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारतात. मराठी भाषकांची बहुसंख्या असल्याने गुढीपाडवा, होळी, गोकुळाष्टमी, दिवाळी यांसारखे सण मोठय़ा उत्साहात साजरे होतातच. शिवाय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनीही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हल्ली अनेक सोसायटय़ांमध्ये वार्षिक सांस्कृतिक महोत्सव भरविले जातात. लक्ष्मी पार्कवासीही तशाच प्रकारचा महोत्सव भरविण्याच्या विचारात आहेत.
हिरवाई
सुरक्षिततेबरोबरच परिसर स्वच्छतेविषयीही येथील रहिवासी विशेष जागृत आहेत. त्याचप्रमाणे या काँक्रीटच्या इमारतींमध्ये गारवा टिकून राहावा म्हणून लक्ष्मी पार्क फेडरेशनच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यात ४५० हून अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत. विशेष म्हणजे सोसायटीतील रहिवासी मोठय़ा आपुलकीने या वृक्षांची जोपासना करतात. त्यामुळे आवारात घनदाट सावली असते. प्रामुख्याने उच्च मध्यमवर्गीय तसेच मध्यमवर्गीय लोक वसाहतीत राहतात. डॉ. शेंदारकर, डॉ. आशीर्वाद ठाकूर यांसारखी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी लक्ष्मी पार्कमध्ये राहतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील प्राध्यापक डगलस जॉन या वसाहतीत राहतात. लवकरच त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन राष्ट्रपती भवनात भरविण्यात येणार आहे. तसेच सारेगम फेम चिराग पांचाळही या वसाहतीमध्ये राहतो. सुरुवातीच्या काळात ११०० ते १६०० रुपये चौरस फुटाच्या दराने खरेदी केलेल्या सदनिकांची किंमत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ५० ते ८० लाख रुपयांच्या घरात गेली आहे. फेडरशनचे कार्यकारी मंडळामधील अशोक पालांडे, डॉ. शेंदारकर, सुधीर मेनन, दशरथ शेठकर, शशी बधे, प्रदीप आंबेकर, नंदकुमार वारिअर आणि अरविंद नाईक ही मंडळी वसाहतीच्या सर्व कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा करीत असतात.
चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ
वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांची चैतन्य नावाची संघटना नावाप्रमाणेच उत्साही आहे. या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. अलीकडेच या संघटनेच्या कार्याचा परिचय करून देणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सावंत आजी यांनी दिली.
समस्या
* ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेतील सर्व नियम आणि अटींची पूर्तता करूनही अद्याप येथील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही.
* महानगरपालिकेकडून होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध वसाहतीतील नागरिक संताप व्यक्त करतात. याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
* वसाहतीला चारही बाजूने भक्कम अशी संरक्षक भिंत असूनही येथील आजूबाजूच्या वस्त्यामधील लोक सुरक्षा भिंतीवरून कचरा टाकतात. त्यामुळे या कचऱ्याचे करायचे काय ही सर्वात मोठी समस्या रहिवाशांना भेडसावते.
* सावरकर नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर परिसरातील लोक येथे अनधिकृतपणे वाहने पार्क करतात.
* वसाहतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर आणि बाहेरील गाडय़ा लक्ष्मी पार्कच्या आवारात उभ्या केल्या जातात.
* वसाहतीच्या समोर असलेला पदपथ दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी व्यापलेला असून त्यावरून चालणे त्रासदायक बनले आहे.
या सर्व समस्यांना आळा घालण्यासाठी वसाहत फेडरेशन प्रयत्न करत आहे.