लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच बिर्याणीची लज्जत चाखायला मनापासून आवडत असते. बिर्याणी शिजू लागली की तिचा स्वाद लपूच शकत नाही. पिवळी लालसर रंगाची बिर्याणी आणि त्यातल्या मसाल्यात अखंड बुडालेल्या चिकन अथवा मटणाच्या तुकडय़ांवर कधी एकदा ताव मारतोय अशी अवस्था सगळ्यांचीच होत असते. परंतु हीच बिर्याणी शुभ्र पांढऱ्या रंगात मिळत असेल आणि तिचे नाव मलई बिर्याणी असे असेल तर खवय्यांचे कुतूहल आणखीनच चाळवले जाते. अशाच मलई आणि शिग बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी भाईंदर पश्चिम येथील मांडली स्ट्रीटमधल्या लजीज बिर्याणीला मात्र आवर्जून भेट द्यावी लागेल.

नेहमीच्या बिर्याणीपेक्षा मलई बिर्याणी बनविण्याची पद्धत काहीशी निराळी आहे. एरव्ही बिर्याणीसाठी हळदीचा वापर केला जातो म्हणूनच त्याला पिवळा रंग येत असतो शिवाय त्याच्या मसाल्यात दह्य़ाचा वापर केला जातो. परंतु मलई बिर्याणीसाठी फ्रेश क्रीम आणि मॅयोनिजचा उपयोग केला जातो शिवाय ताज्या दुधाचाही वापर यासाठी केला जातो. बिर्याणीसाठी सर्वात आधी चिकनच्या तुकडय़ांना मीठ आणि मिरची लावून ते शेगडीवर खरपूस शेकले जाते. त्यानंतर फ्रेश क्रीम, मायोनिज, आले, लसूण, गरम मसाला यांचे मिश्रण तयार करून चिकनचे तुकडे या मसल्यात मॅरिनेट केले जातात. त्यानंतर या मिश्रणावर लोणी (बटर) पसरून त्यात जळता निखारा ठेवला जातो आणि हे मिश्रण मग काही काळ बंद करून ठेवले जाते. लोणी आणि जळता निखारा यांचा आगळा वेगळा स्वाद मिश्रणाला लागला की मग निखारा काढून टाकला जातो आणि त्यावर बिर्याणीचा भात पसरण्यात येतो. बिर्याणीचे भांडे वरून बंद करून मग ते शेगडीवर शिजवण्यासाठी ठेवले जाते. या प्रकाराला दम लगाना असे म्हटले जाते. बिर्याणीतून हलका धूर येण्यास सुरुवात झाली की दम लगानाची प्रक्रिया पूर्ण होते. दम लगाना ही प्रक्रिया म्हणजे बिर्याणी बनविणाऱ्याचे कसब असून त्यावरच बिर्याणीची चव अवलंबून असते. याच पद्धतीने शिग बिर्याणी तयार केली जाते. यात चिकनचे तुकडे न वापरता चिकनचा खिमा केला जातो. हा खिमा लोखंडी सळीवर लावून मग शेगडीमध्ये शेकला जातो आणि मग ते बिर्याणीच्या मसाल्यात ठेवले जातात.

दोन्ही बिर्याणीची चव नेहमीच्या बिर्याणीपेक्षा नक्कीच वेगळी लागते. लजीज बिर्याणीचे मोहम्मद उमर, शरीफ उमर, रियाझ उमर यांची ही बिर्याणी बनविण्याची खासियत असून आगाऊ ऑर्डर दिली तर बिर्याणी घरपोच पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते.

  • पत्ता- लजीज कॅटर्स, मांडली स्ट्रीट, नगरभवनसमोर, भाईंदर (पश्चिम), संपर्क ९३२२३९३१७६.