उल्हासनगर पालिकेतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागातील कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा एलबीटी वसुलीत घोटाळा केला असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने, पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी या विभागातील पंधरा निरीक्षकांना मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले.
एलबीटी विभागातील अनिल खतुरानी, राजू पिंजानी, अशोक चांदवानी, डी. डी. पंजाबी, उद्धव लुल्ला, कमल रेलवानी, राम आयलानी, नरेश जेसवानी, संतोष राठोड, चंदू साधवानी, महेंद्र पंजाबी, अनिल तलरेजा, बलराम गिदवानी, शंकर साहेजा, संतोष खोटरे या निरीक्षकांना निलंबित केले. कर्मचाऱ्यांकडून कच्च्या पावत्या व पक्क्या पावत्यांमध्ये घोळ घातला जातो. या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत एलबीटी वसुली कमी व कर्मचारी स्वत:ची धन करीत आहेत. यामुळे पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असल्याची टीका, शिवसेनेचे नगरसेवक सुरेश जाधव, सुभाष मनसुलकर, राजेंद्र भुल्लर यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली होती.
एलबीटी वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून गडबड करण्यात येत होती, अशा तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची पालिकेकडून चौकशी करण्यात आली. त्यात प्रथमदर्शनी पंधरा कर्मचारी दोषी आढळून आले त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले.