डोंबिवली – डोंबिवलीत एका रात्रीत बेकायदा बांधकामे उभी राहिली नाहीत. एका रात्रीत या बेकायदा बांधकामांची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली नाहीत. तर कल्याण डोंबिवली प्रभाग अधिकारी, दस्त नोंदणी अधिकारी, बँक अधिकारी या सगळ्यांचे राजकीय हस्तक अशी मोठी टोळी ही बेकायदा बांधकामे डोंबिवलीत उभी राहत असताना सक्रिय होती आणि आहे. या सर्व बेकायदा बांधकामांच्या टोळीचा म्होरक्या ठाण्यात आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांना पाठबळ मिळत आहे, अशी टीका मनसेचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सोमवारी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर केली आहे.
मनसे नेते राजू पाटील यांच्या टीकेचा सर्व रोख कल्याण-डोंबिवली शहरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ठाण्यातील दोन नेत्यांवर आहे. डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींंमधील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दिव्यातील लोक आक्रोश करत आहेत. या लोकांना येऊन भेटणे, त्यांंना दिलासा देणे हे पालकमंत्री, खासदार म्हणून यांची कामे नाहीत का. त्यांना भेटायला मुंबईत का बोलविता, असा प्रश्न नेते पाटील यांनी केला. गंगेत जाऊन डुबकी मारून सगळी पापे धुऊन जातील, त्यापेक्षा आता मोठे संकट उभे राहिलेल्या लोकांना भेटले, त्यांना समाधानाचा एक शब्द दिला तर ते पुण्य अधिकचे असेल, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
जोपर्यंत डोंबिवली परिसरातील बेकायदा बांधकामांची उभारणी करणारी साखळी तुटत नाही. या साखळीला ठाण्यातून, तेथल्या ‘आका’चा पाठिंबा मिळत राहील तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे. ही साखळी तुटणे खूप महत्वाचे आहे. स्थानिक कोणीही आमदार, खासदार या विषयावर बोलत नाही, या प्रश्नावर मनसे नेते राजू पाटील यांनी ज्यांच्या प्रभागात दोनदा तोडलेली बेकायदा इमारत पुन्हा उभी राहते ते या विषयी काय बोलणार, असा प्रतिप्रश्न केला. काही जण या सगळ्या प्रक्रियेत हस्तक आहेत. दिव्यात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामध्ये कोणाच्या भागीदारी आहेत हे सर्वश्रृत आहे. आता गोंगाट झाल्यावर या बेकायदा इमारतींना नोटिसा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असे पाटील यांंनी सांंगितले.
डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील रहिवाशांना कायदेशीर मार्गाने जी मदत करणे शक्य होईल ती मनसेकडून केली जाईल. या इमारतीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक करून विकासकांनी त्यांना घरे विकली आहेत. त्यामुळे या प्रकरणात लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पाठबळ देणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मनसेची भूमिका असेल, असे माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांना सांगितले.