सोनाली बन्सल, अखिलेश यादव, विद्या सागर, काशीद यादव, अभिषेक वर्मा. नावावरून उत्तर प्रदेशातील रहिवासी वाटणारे हे सर्वजण कल्याण तालुक्यातील सोनारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. नावावरून अमराठी वाटत असले तरी हे सगळे विद्यार्थी अस्खलित मराठी बोलत असून मराठी भाषेतून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका बाजूला मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे मराठी भाषा संकटात आहे, असा ओरडा केला जात असताना हे विद्यार्थी मात्र कोणत्याही अडचणीशिवाय मराठी शिकत आहेत. कल्याण तालुक्यातील विविध शाळांमधील अमराठी विद्यार्थ्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून या शाळांमध्ये १८ टक्क्यांहून अधिक अमराठी विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, ठाणे शहरातील मराठी शाळा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी धडपड करत असताना जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामधील मराठी शाळांमध्ये मात्र अमराठी विद्यार्थीही मराठी शिक्षण घेण्यासाठी सरसावले आहेत. मूळ उत्तर प्रदेश आणि देशातील इतर प्रांतांमधून ठाण्यातील ग्रामीण भागात आलेले हे विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेपेक्षाही अधिक प्रभावीपणे अस्खलितपणे मराठी संवाद साधतात. या विद्यार्थ्यांच्या केवळ नावावरूनच हे विद्यार्थी अमराठी असल्याचे जाणवते. ठाणे ग्रामीण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतही या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला घराच्या जवळ, कमी खर्चामध्ये शिक्षण मिळावे यासाठी मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला जात असला तरी आम्हाला ही भाषा आवडू लागल्याचे हे विद्यार्थी सांगतात.
अमराठींतला मराठी टक्का
*कल्याण तालुक्यातील शाळांमधील ८ हजार ६९४ मुलांमध्ये दीड हजाराहून अधिक म्हणजे सरासरी १८ टक्के विद्यार्थी हे अमराठी आहेत.
*सोनारपाडा या शाळेमध्ये एकूण नऊशे विद्यार्थ्यांपैकी पाचशे विद्यार्थी अमराठी आहेत.
*खोणी गावामध्ये ३३ टक्के अमराठी विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.
*कोळे शाळेतील ४०० पैकी ८० विद्यार्थी अमराठी आहेत.
मराठी भाषा आपलीशी वाटते
पहिल्या इयत्तेतील मुलांना सुरुवातीला शिक्षण घेताना अडचणी येत असतात. मात्र त्यांना चित्रफिती दाखवून माहिती दिली जाते. अनेक उच्चार हिंदीतून समजावून सांगितले जातात. लहान मुलांची आकलनशक्ती चांगली असल्याने माध्यमाची अडचण भेडसावत नाही. काही महिन्यांतच भाषा आत्मसात करून ते शाळेच्या वातावरणात रुळू लागतात.
– सोनारपाडा शाळेतील शिक्षक
मराठी व हिंदी वर्णमाला ही सारखीच असल्यामुळे मुलांना शब्द समजायला सोपे जातात. त्यामुळे आम्ही मुलांना मराठी शाळेत टाकतो. शिवाय महाराष्ट्रात अनेक वर्षे राहत असल्यामुळे मराठी भाषाही आपलीशी वाटत आहे.
– शबनम अन्सारी, पालक
विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न
देशातील विविध भागांतून स्थलांतरित होणारे कुटुंब मोठय़ा संख्येने ठाणे जिल्ह्य़ात स्थायिक होत असून कष्टकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना महागडय़ा शाळा परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी शिक्षकांच्या वतीने प्रयत्न करून त्यांना शाळेची ओळख करून दिली जाते. विविध कंपन्यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधीची मागणी करून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.