कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा इमारती मधील पालिकेच्या नियंत्रणाखालील वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. हे वाहनतळ सुरू झाल्यानंतर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरील वाहनतळे बंद होण्यास मदत होणार आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील बाजीप्रभू चौकात पाच वर्षापूर्वी पाटकर प्लाझा इमारत बांधून पूर्ण झाली. या इमारतीच्या तळ आणि पहिल्या माळ्यावर तीन ते चार हजार चौरस फुटाची दोन प्रशस्त वाहनतळे आहेत. ही वाहनतळे सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. उपप्रादेशिक परिवहन अधिकरी, वाहतूक अधिकारी यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरील रिक्षा वाहनतळ बंद करुन ते पाटकर प्लाझा मधील वाहनतळ जागेत सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
काही राजकीय अडथळे या विषयात आले आणि वाहनतळाचा विषय बारगळला. तळ आणि पहिल्या मजल्यावरील वाहनतळांवर सुमारे २५० हून अधिक रिक्षा एकावेळी प्रवासी वाहतूक करतील, असा आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला होता. या वाहनतळाच्या माध्यमातून केळकर रस्ता, पाटकर रस्ता, फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता भागातील रिक्षा एकाच ठिकाणी उभ्या करण्याचे नियोजन होते.
पाच वर्षापासून पालिकेचे वाहनतळ पडिक असल्यामुळे हे वाहनतळ उपयोगात आणण्यासाठी गेल्या वर्षापासून पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. मागील वर्षी हे वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी ठेकेदाराने सुरक्षा अनामत रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द झाली होती, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. मानपाडा रस्ता, आगरकर रस्ता, नेहरु रस्ता, फडके रस्ता, नेहरु मैदान, रामनगर भागातील रस्त्यांवर दुतर्फा चालक दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करतात. या चालकांना वाहनतळामुळे वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. रस्त्यावरील वाहनतळामुळे होणारी वाहन कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी
पाटकर प्लाझा मधील वाहनतळ तीन वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एका राजकीय पक्षाचा स्थानिक जुना पदाधिकारी पाटकर प्लाझा इमारतीवर हुकमत ठेऊन आहे. या इमारती मधील वाहनतळ आम्हालाच चालवायला मिळाला पाहिजे, असे पदाधिकाऱ्याचे मत असल्याने पालिकेला यापूर्वी हे वाहनतळ सुरू करता आले नसल्याचे कळते.
“डोंबिवलीतील पाटकर प्लाझा इमारतीमधील वाहनतळ सुरू करण्याच्या दृष्टीने ठेकेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रतिसाद मिळेल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. डोंबिवली पूर्व भागातील रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना सुरक्षित जागा उपलब्ध होईल.”