केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी योजने’चा एक भाग म्हणून ठाणे शहरात सुमारे दहा ते बारा हजार एलईडी विद्युत दिवे बसविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत अखेर मान्यता देण्यात आली. मुंबई शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव राजकीय वादात सापडला असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते यासंबंधी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दरम्यान, या प्रस्तावाला मान्यता देत असताना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. ठाण्यातील गोखले मार्ग, पाचपाखाडी तसेच वर्तकनगर पट्टय़ात प्रयोगिक तत्त्वावर हे दिवे बसवून टप्प्याटप्प्याने इतरत्रही हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत सुमारे ३२,५०० पथदिवे असून त्यापैकी ७२०० पथदिवे एलईडी पद्धतीने बसविण्यात आले आहेत. उर्वरित सोडियम व्हेपर पद्धतीचे दिवे आहेत. एलईडी दिव्यांमुळे विजेची बचत होत असल्याने शहरात हे दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आणला होता. या प्रस्तावानुसार शहरात सुमारे दहा ते बारा हजार एलईडी विद्युत दिवे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून युरोपीयन कमिशनमार्फत वीज बचतीचा हा प्रकल्प शहरात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून या प्रकल्पाचा सर्व खर्च ठेकेदार उचलणार आहे. संबंधित ठेकेदाराला विजेच्या बचतीतून उत्पन्न मिळणार असून त्यापैकी ५० टक्के हिस्सा ठेकेदार महापालिकेला देणार आहे. त्यामुळे भांडवली व महसुली खर्च न करताही या प्रकल्पातून महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा होईल, असा दावा केला जात आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रस्ताव मंजूर करत असतानाच काही नगरसेवकांनी ठाणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एलईडी दिव्यांच्या खांबांवरच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्याची मागणी केली. अशा प्रकारचा एकत्रित कामाचा प्रस्ताव वसई-विरार महापालिकेत मंजूर झाला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेनेही त्याच धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर का होईना हा प्रयोग राबविण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
अद्ययावत नियंत्रण कक्ष
या प्रकल्पासाठी ठेकेदारामार्फत मुख्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या कक्षातून या पथदिव्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरातील एकही एलईडी दिवा बंद झाला, तर नियंत्रण कक्षाला लगेचच माहिती मिळणार आहे.

Story img Loader