ठाणे : भिवंडी येथील पडघा भागातील गोदाम क्षेत्रामध्ये शुक्रवारी बिबट्या आढळून आला होता. मध्यरात्री या बिबट्याला पकडण्यास वन विभागाला शक्य झाले आहे. हा बिबट्या सात ते आठ वर्षांचा नर असून वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवत आहे. सुमारे सात ते आठ तास वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. बिबट्याच्या समोर पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवण्यात आली आणि तिच्या शिकारीसाठी बिबट्या पिंजऱ्यात गेल्याने वन विभागाला त्याला पकडणे शक्य आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडीतील पडघा भागात गोदाम क्षेत्र आहे. या गोदाम क्षेत्रात शुक्रवारी सकाळी एका ट्रक चालकाला बिबट्या दिसला. ट्रक चालकाने तात्काळ याची माहिती गोदाम परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली. बिबट्या शिरल्याची माहिती येथील स्थानिकांना मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. बिबट्याचा शोध घेतला असता, तो एका गोदामाच्या मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या गटारामध्ये बसल्याचे स्थानिकांना दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास वन विभागाचे पथक आणि पाॅज् प्राणी रक्षक संस्था घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतु गटार अरुंद असल्याने तसेच गोदाम परिसर अत्यंत चिंचोळा असल्याने त्याला पकडणे शक्य होत नव्हते. अखेर वन विभागाच्या पथकाने रात्री गटाराच्या एका दिशेकडील काही भाग तोडून तेथे पिंजरा लावला. या पिंजऱ्यामध्ये एक कोंबडी ठेवण्यात आली. दोन ते तीन तास उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. अखेर मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात कोंबडीच्या शिकारीसाठी आला आणि तो पिंजऱ्यात अडकला. गोदाम भागातून पिंजरा बाहेर काढणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले आणि पिंजऱ्यासह बिबट्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. या भागात यापूर्वी कधीच बिबट्या आढळून आला नव्हता अशी माहिती स्थानिकांनी दिली. बिबट्याची वाट चुकली असावी त्यामुळे तो या ठिकाणी आला असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – कल्याण : दिडशे ते तीनशे मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना प्रभागस्तरावर मंजुरी

हेही वाचा – मुंबईसह ठाणे, भिवंडीत १४, १५ डिसेंबर रोजी १५ टक्के पाणीकपात

हा बिबट्या नर असून त्याला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशू वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनया जंगले यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard in godown area in bhiwandi ssb