शहापूर तालुक्यातील (जि.ठाणे) डोळखांब वन परिक्षेत्रातील गांडुळवाड भागातील मोहाची वाडी भागात दोन दिवसापूर्वी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या चार शेळ्यांवर हल्ला करुन एक बकरी फस्त केली. तीन बकऱ्यांचे मृतदेह जंगलाच्या भागात आढळून आले.शेतीसाठी गवत काढणी, राबणीची कामे सुरू झाली आहेत. जंगलात जाऊन गवत, झाडांच्या फांद्या तोडणीची कामे सुरू असताना डोंबिवली वन हद्दीतील गांडुळवाड भागात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे जीवन दुधपती गाय, म्हैस आणि शेळ्यांवर अवलंबून असते. सकाळी पशुधन जंगलात चरायला सोडले की संध्याकाळी हे पाळीव प्राणी नियमित घरी येतात.
हेही वाचा >>>ठाणे: क्लस्टर योजनेतील इमारत उभारणीची कामे लवकरच सुरु होण्याची चिन्हे
मोहाची वाडी भागातील एका शेतकऱ्याने आपल्या चार शेळ्या सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे जंगलात चरायला सोडल्या. संध्याकाळी नियमित घरी येणाऱ्या शेळ्या घरी आल्या नाही म्हणून गाव परिसरात शोध घेतला, त्याला शेळ्या आढळून आल्या नाहीत. शेतकऱ्याने गावा जवळील जंगलात जाऊन पाहिले त्यावेळी त्याला तीन शेळ्या वेगळ्या भागात मरुन पडल्या होत्या. त्यांच्या मानेवर आणि इतर भागावर नखांचे ओरबाडे आढळून आले. एक बकरी आढळून आली नाही. त्यामुळे एक बकरी फस्ती करुन बिबट्याने तीन शेळ्यांचे रक्त शोषून घेऊन तो जंगलात निघून गेल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.
हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रुळ ओलांडून जीवघेणा प्रवास
वन विभागाला ही माहिती शेतकऱ्यांनी दिली. वन विभागाने या भागात बिबट्याच्या शोधार्थ मोहीम सुरू केली आहे. डोळखांब परिसरातील गावांमध्ये जाऊन वनाधिकारी बिबट्या दिसला तर घ्यावयाची काळजी. रात्री पशुधन शेतकरी बांधून ठेवतो. त्याठिकाणी घ्यावयाची खबरदारी याची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. गेल्या वर्षी डोळखांब, कसारा भागात बिबट्याचा वावर आढळून आला होता. कसारा भागात एक शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. जव्हार तालुक्यातील विक्रमगड भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ठाणे जिल्ह्यातील बिबट्याचा अधिवास वाढत असल्याने वन विभागाने या वन्यजिवांच्या संवर्धनासाठी आतापासून नियोजन सुरू करावे अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.
हेही वाचा >>>वाहन कोंडी टाळण्यासाठी पेंढरकर काॅलेज ते घरडा सर्कल वाहतुकीचे नियोजन
रानडुकराचा हल्ला
मुरबाड तालुक्यातील किसळ गाव हद्दीत रानडुकराने केलेल्या हल्ल्यात हरेश पारधी या तरुणाचा मृत्यू झाला. या गावाजवळील साखरे (धारगाव) हद्दीत मारुती पवार (५५) हे शेतकरी शेतावरील खळ्यावर गेले होते. तेथे भात पेंढ्यांचा ढीग लावला होता. या ढीगाच्या ओडाशाला बसलेले रानडुक्कर मारुती यांच्या निदर्शनास आले नाही. बेसावध असताना रानडुकराने मारुती यांच्यावर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केली. डुकराच्या तावडीतून सुटका करुन घेतल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.