ठाण्यातील घोडबंदर येथील कासारवडवली भागात २२ फेब्रुवारीला काही गृहसंकुलांच्या आवारात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्या संकुलाच्या संरक्षण भिंतीवरून चालत असल्याचे काही सीसीटीव्हींमध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कासारवडवली येथील पेट्रोल पंप परिसरात काही गृहसंकुले आहेत. ही गृहसंकुले बिबट्याचा अधिवास असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून हाकेच्या अंतरावर आहेत. २२ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास या भागातील गृहसंकुलांच्या संरक्षण भिंतींवरून बिबट्या चालत असल्याचे संकुलातील सीसीटीव्हीत कैद झाले होते.
रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील बिबट्या पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांनी वन विभागाला याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी केली. वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला आहे, परंतु तो कुठे गेला आणि किती वर्षाचा असावा याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, २२ फेब्रुवारीला बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर तो पुन्हा दिसला नाही. असे येथील संकुलातील रहिवासी रोहीत गायकवाड यांनी सांगितले.