विशेष प्रतिनिधी, ठाणे
मुरबाड तालुक्यातील दुर्गम गावपाडय़ांमध्ये पुन्हा एकदा बिबटय़ाचा वावर आढळून आला असून त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. सिंगापूरमधील एका पाडय़ावर एका बिबटय़ाने बोकडावर हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धसईजवळील ओजिवडे येथील बकऱ्यांवर हल्ला झाल्याचे आढळून आले. या घटनांनंतर वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून संवेदनशील गावपाडय़ांमध्ये रात्री फटाके फोडून आवाज केले जात असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.
वर्षभरापूर्वी टोकावडे परिक्षेत्रातील जंगलात एका बिबटय़ाने गावकऱ्यांची झोप उडवली होती. सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमधील माळशेज, भीमाशंकर तसेच जुन्नर परिसरातील जंगलांमध्ये बिबटय़ांचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षांत मुरबाड तालुक्यातील दुर्गम गावपाडय़ांमध्ये घुसून तेथील पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवरही बिबटय़ाने हल्ला केल्याचे प्रकार घडले होते. गेल्या वर्षी एका बिबटय़ाने फारच उच्छाद मांडला होता. अखेर वनाधिकाऱ्यांनी त्याला ठार केले.
त्यानंतर या परिसरातील गावपाडय़ांमधील रहिवाशांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. जंगलाशेजारी असणाऱ्या पाडय़ांबाहेर सौरदिवे बसवून रात्री, बिबटय़ा वस्तीत शिरणार नाही, याची काळजी घेण्यात आली. गेल्या वर्षीच्या त्या हल्ल्यातून ग्रामस्थ कसेबसे सावरत असतानाच आता पावसाळा सरताच पुन्हा बिबटय़ा वस्तीत शिरल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असल्याने या काळात बिबटे जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भागात गस्त वाढवली आहे. तसेच बिबटे वस्तीजवळ येऊ नयेत, म्हणून रात्री फटाके फोडून आवाज केले जात आहेत.
– तुळशीराम हिरवे, वनपरिक्षेत्र अधिकारी, टोकावडे (दक्षिण)